सध्या हेमा मालिनी व धर्मेंद्र यांचं नाव बरंच चर्चेत आलं आहे. सनी देओलचा लेक करणच्या लग्नाला देओल कुटुंबियांनी अगदी धमाल मस्ती केली. मात्र या विवाहसोहळ्याला हेमा मालिनी गैरहरज होत्या. यावरुनच कित्येक चर्चाही रंगल्या. हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या लव्हस्टोरी काही वर्षांपूर्वी बरीच चर्चेत आली. इतकंच नव्हे हेमा मालिनी यांचे वडील या लग्नाबाबत नाराज होते. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी याबाबत भाष्य केलं होतं.
हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं तेव्हा धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलं होती. पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचा घटस्फोटही झाला नव्हता. याच कारणावरुन हेमा मालिनी यांच्या वडिलांना धर्मेंद्र यांच्याबरोबर असलेलं नातं मान्य नव्हतं. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हेमा मालिनी यांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत विचारण्यात आलं होतं.
तेव्हा त्या म्हणाल्या, “धर्मेंद्र यांना मी पहिल्यांदा भेटली तेव्हा ते आयुष्यभर माझे जोडीदार असतील असा विचार मी कधीच केला नव्हता. काही काळाने मी त्यांच्या प्रेमात पडले”. शिवाय वडिलांच्या नाराजीबाबतही हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या, “ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कारण धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालं होतं”.
हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या नात्याच्या त्याकाळी बऱ्याच चर्चा रंगत होत्या. सनी देओल, बॉबी देओल, विजेता व अजेता अशी धर्मेंद्र यांची चार मुलं. या चार मुलांनंतर त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रकाश कौर यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचं अजूनही चांगलं नातं आहे. करण देओलच्या लग्नामध्ये दोघांचं एकत्रित फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं.