Dharmendra Birthday Speial : अभिनेते धर्मेंद्र यांचा आज ८७वा वाढदिवस. ६०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये धर्मेंद्र यांचं नाव टॉपला होतं. त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. अनेक सुपरहिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावे आहेत. आपल्या कामामुळे कायमच धर्मेंद्र चर्चेत राहिले. पण त्यांचं खासगी आयुष्यही बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरलं. धर्मेंद्र यांना दारूचं व्यसन होतं. याबाबतचा त्यांचा एक किस्सा चर्चेत आला होता.
आणखी वाचा – Video : गर्दीतच हात पकडला, सेल्फी घेतला अन्…; भाऊ कदमची लेक व रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला. धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की, जेव्हा दारू पिऊन ते घरी जायचे तेव्हा घरात काम करणाऱ्या नोकराला त्यांनी सक्त ताकीद दिली होती. मी आलो की अगदी शांतपणे घराचा दरवाजा उघडायचा. मात्र एक दिवस दारूच्या नशेमध्ये धर्मेंद्र घरी पोहोचले. घराचे दोन्ही दरवाजे बंद होते.
घराचे दोन्ही दरवाजे बंद आहेत हे पाहून धर्मेंद्र संतापले. त्यांनी घरात काम करणाऱ्या नोकराला बराच वेळ आवाज दिला, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. पण काही वेळानंतर घराचा दरवाजा खोलण्यात आला. फक्त अंधार होता त्यामुळे समोर कोणती व्यक्ती आहे हे धर्मेंद्र यांना कळेना. त्यांनी घराचा दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीला रागाने पकडलं आणि म्हणाले, “मी तुला सांगितलं होतं की माझ्या रूमचा दरवाजा उघडा ठेव. पण तू दरवाजा का नाही उघडला? आता जा आणि माझ्या रूमचा दरवाजा उघड.”
धर्मेंद्र यांना वाटलं की आपण ज्या व्यक्तीला ओरडत आहोत ती व्यक्ती म्हणजे घरातील व्यक्ती आहे. पण प्रत्यक्षात ती व्यक्ती म्हणजे धर्मेंद्र यांचे वडील होते. वडिलांना पाहून धर्मेंद्र घाबरले. वडिलांनी धर्मेंद्र यांची कॉलर पकडून त्यांना त्यांच्या आईजवळ नेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांनी वेळेत घरी येण्याचं व कधीच दारू न पिण्याचं वचन आई-वडिलांना दिलं. धर्मेंद्र यांना आजही हा प्रसंग आठवला की स्वतःचीच लाज वाटते.