Happy Birthday Dharmendra Deol: “गुरबत नाम की नंगी तलवार पर चलकर मेरी जिंदगीने तवाजन सिखा है वक्त के ये नोकिले पत्थर अब क्या डराएंगे मुझे” हे वाक्य आहे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं. गरीबीत आयुष्य जगून प्रचंड मेहनत करुन त्यांनी नाव कमावलं आहे. धर्मेंद्र, धरम, धरमपाजी, देशी मातीतला ही मॅन ही सगळी बिरुदं त्यांनी कमवली. वडील शिक्षक होते आणि शेतीही करायचे. प्रचंड शिस्तप्रियही होते. अशा सगळ्या वातावरणात वाढलेल्या धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. धर्मेंद्र हे आज ८९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. एक काळ त्यांचा होता यात काहीही शंका नाही. अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटलं जातं. ते आहेत यात काही शंकाच नाही. मात्र त्यांना महानायक घडवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र देओल.
१९६० पासून धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत
दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, गुरुदत्त यांचा एक काळ सिनेमासृष्टीने पाहिला. त्यानंतरचा काळ होता तो धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि पुढे अमिताभ बच्चन यांचा. सिनेमातल्या ‘हिरो’ची इमेज बदलून टाकण्याचं श्रेय जातं ते धर्मेंद्र यांना. कारण शोले सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना घ्यावं हा सल्ला रमेश सिप्पींना त्यांनीच दिला होता. स्वतः अमिताभही शोले सिनेमातल्या ‘जय’च्या भूमिकेचं श्रेय ‘विरु’ला म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या धर्मेंद्र यांनाच देतात.
३०० हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम
धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आत्ता परवा परवा कडे आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमातही ते झळकले होते. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ ‘शोला और शबनम’, ‘बंदिनी’, ‘हकिकत’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘शिकार’, ‘इज्जत’, ‘आदमी और इन्सान’, ‘मेरा नाम जोकर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये १९६० ते १९७० या दशकात ते झळकले. १९७५ ला शोले आला आणि धर्मेंद्र यांची इमेज अॅक्शन हिरोची झाली. फाईट सीन असो किंवा कॉमेडी दोन्ही प्रकारांमध्ये धर्मेंद्र यांनी आपलं नशीब आजमावलं आणि दोन्ही जॉनरचे सिनेमा त्यांच्या वाट्याला आले. ‘शोले’मधला ‘विरु’ ज्या ताकदीने त्यांनी साकारला त्याच ताकदीने ‘चुपके चुपके’ प्यारे मोहन आणि ‘डॉ. परिमल त्रिपाठी’ या भूमिकाही साकारल्या.
१९७० च्या दशकात जगातल्या देखण्या पुरुषांच्या यादीत कोरलं नाव
१९७० च्या दशकात धर्मेंद्र यांचं नाव जगातल्या देखण्या पुरुषांच्या यादीत समाविष्ट झालं. प्रेक्षकांचं अमाप प्रेम त्यांना मिळालं. हॉलिवूडमध्ये जसा अरनॉल्ड होता तसा आपल्याकडे आपल्या देशी मातीतला ही मॅन काम करत राहिला. त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. उत्तम अभिनय करुनही त्यांना पुरस्कार मिळाला नाही मात्र त्याबद्दल त्यांनी कधी खंत बाळगली नाही. प्रेक्षकांचं प्रेम पुरस्कारापेक्षा कमी नसतं हेच ते कायम म्हणत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “मी कधीही सिनेमा हिट झाला म्हणून फी वाढवली नाही. माझं लक्ष्य एकच होतं की लोकांच्या मनात मला स्थान हवं होतं. मला ते स्थान मिळालं. प्रसिद्धी मिळते, वलय मिळतं त्याची नशाही असते ती उतरते. पण प्रेम असं असतं जे मनात वसतं. मला लोकांच्या मनातलं ते प्रेम हवं होतं जे प्रेम माझ्यावर प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं आणि आजही करतात त्याचं मला समाधान आणि आनंद आहे.”
जंजीर सिनेमा धर्मेंद्र यांनी का नाकारला?
अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’ ‘जंजीर’ हा सिनेमा धर्मेंद्र यांना ऑफर झाला होता. याबद्दलचा किस्सा स्वतः धर्मेंद्र यांनीच सांगितला होता. “सलीम खान यांना मी साडेसतरा हजार रुपये दिले आणि जंजीर सिनेमा विकत घेतला. प्रकाश मेहरांसह मी समाधी सिनेमा केला होता. मला तो सिनेमा करायचा होता. मी प्रकाश मेहरांना ती गोष्ट दिली. माझ्या एका बहिणीला प्रकाश मेहरांनी रोल नाकारला होता ती बाब तिच्या मनात राहिली होती का? हे माहीत नाही. मात्र मी प्रकाश मेहरांसह जंजीर करणार हे तिला समजल्यावर ती आली. तिने मला भावनिक दृष्ट्या खूप गळ घातली की तू हा सिनेमा करु नकोस. मग मला माझे घरातलेही म्हणू लागले हा सिनेमा सोड. त्यामुळे मला ‘जंजीर’ सिनेमा सोडावा लागला. मला प्रकाश मेहरांनी समजावलं पण मी तो सिनेमा केला नाही. त्यानंतर प्रकाश मेहरांनी राज कुमार यांना विचारलं, देवानंदना विचारलं कुणीही तो सिनेमा केला नाही. ‘जंजीर’ सिनेमा सोडावा लागल्याचं मला दुःख झालं मात्र अमिताभसाठी मी आनंदी आहे. मला वाटतं तो सिनेमा त्याच्याच (अमिताभ) नशिबात होता. त्यामुळेच तो त्या सिनेमामुळे आजही ओळखला जातो. अशा गोष्टी सिनेसृष्टीत होत असतात.” असं धर्मेंद्र म्हणाले होते.
शोले अमिताभ बच्चन यांना कसा मिळाला?
शोले सिनेमासाठीचे कलाकार ठरले होते. विरुच्या भूमिकेत धर्मेंद्र आणि जयच्या भूमिकेत शत्रुघ्न सिन्हा. अमिताभ बच्चन तेव्हा धर्मेंद्र यांच्याकडे जायचे. अमिताभ बच्चन यांनी विचारलं की काही रोल आहे का? तेव्हा रमेश सिप्पींना धर्मेंद्र यांनी सांगितलं की जयची भूमिका अमिताभ बच्चन यांना द्या. त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांना विचारलंही होतं की माझी भूमिका तू अमिताभ बच्चन यांना का दिली? त्यावर धर्मेंद्र म्हणाले होते “काय घडलं मलाही सांगता येणार नाही. पण तो (अमिताभ) माझ्याकडे आला. मला म्हणाला काही भूमिका असेल तर सांगा.. मी रमेश सिप्पींना सांगितलं आणि ती भूमिका त्याला मिळवून दिली.” यावर शत्रुघ्न सिन्हा काहीही म्हणाले नाहीत.
“सब कुछ पा कर भी हासिल ए जिंदगी कुछ भी नहीं, मैने देखें हैं एक से एक सिकंदर खाली हात जाते हुए” असाच धर्मेंद्र यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता. कुठल्यातरी आशेने आपण सिनेसृष्टीत वळलो नाही. लोकांचं प्रेम मिळवायचं याच हेतून आलो मला प्रेम, प्रसिद्धी, पैसा सगळं सगळं मिळालं असं धर्मेंद्र म्हणाले होते.
धर्मेंद्र यांना कोण म्हणालं ग्रीक गॉड?
धर्मेंद्र यांना ‘ग्रीक गॉड’ अशी उपाधी जया भादुरी-बच्चन यांनी दिली होती. तर ‘ही मॅन’ ही उपाधी दिलीप कुमार यांनी दिली होती. याबाबत विचारलं असता की धर्मेंद्र म्हणाले, “अशा उपाध्या मला मिळाल्या. या मिळाल्या की मला जबाबदारी वाढल्यासारखं वाटत आलं आहे. मी कधीही मेथड अॅक्टिंग केली नाही. जी भूमिका माझ्या वाट्याला ती आपल्या परिने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी कायमच करत आलो आहे. लोकांना ते आवडलं याचं मला समाधान खूप जास्त आहे.”
पहिल्या सिनेमासाठी ५१ रुपये मानधन
हिंदी सिनेसृष्टीत ही मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांना पहिल्या सिनेमासाठी ५१ रुपये मानधन मिळालं होतं. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ हा तो सिनेमा होता ज्यासाठी धर्मेंद्र यांना ५१ रुपये मानधन मिळालं होतं. आपल्याला मिळालेले ५१ रुपये हे आपल्यासाठी खूप लकी ठरले असंही धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ चा. त्यांचं खरं नाव धर्म सिंह देओल असं आहे. फिल्मफेअर मॅगझिनच्या टॅलेंट अवॉर्डचे ते विजेते ठरले. त्यानंतर आपलं नशीब आजमावण्यासाठी ते पंजाबहून मुंबईत आले. ज्या सिनेमसाठी त्यांना मुंबईत बोलवण्यात आलं होतं तो सिनेमा बनू शकला नाही. १९६० मध्ये त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
पुरस्कारांविषयी काय भाष्य केलं होतं धर्मेंद्र यांनी?
विविध शेड्स असलेल्या भूमिका धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत साकारल्या. मात्र ते वंचित राहिले पुरस्कारांपासून. त्यांना नॉमिनेशन मिळालं पण पुरस्कार मिळाला नाही. वाट्याला आले ते पुरस्कार कोणते होते? बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला ‘घायल’ सिनेमाचा निर्माता म्हणून. १९९७ ला मिळाला लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार. १९६० ते २०२३ अशी जबरदस्त प्रदीर्घ सिनेकारकीर्द असूनही आपल्या वाटणाऱ्या धर्मेंद्र यांच्या वाट्याला पुरस्कार आले ते असेच. २०१२ मध्ये सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबाबत पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आलं. मात्र फिल्मफेअर किंवा अगदी सहाय्यक अभिनेता म्हणूनही त्यांना पुरस्कार मिळाला नाही. याबाबत विचारलं असता धर्मेंद्र म्हणाले होते की “सुरुवातीला मला वाईट वाटायचं पण जेव्हा या पुरस्कारांबाबत कळलं की त्यामागे कशी खिचडी शिजवली जाते तेव्हा मी यापासून दूर झालो. आपल्याला हे काही जमणार नाही हे मला समजलं होतं.”
“कुत्ते मै तेरा खून पि जाऊंगा’, ‘चुन चुन के मारुंगा’ असं म्हणत व्हिलनला खुन्नस देत आपला देशी ही मॅन म्हणजेच धर्मेंद्र जेव्हा पडद्यावर ओरडायचा तेव्हा लोकांना वाटायचं की हा आपला आवाज आहे. त्यांनी ज्या ज्या भूमिका केल्या त्यात त्यांनी वेगळेपण जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. लोक धर्मेंद्र यांच्या संवादाशी इतके एकरुप झाले होते की ते हा संवाद सिनेमात कधी येईल याची वाट बघायचे.
शर्टलेस झालेला पहिला अभिनेता
स्क्रीनवर शर्टलेस होण्याचा ट्रेंड सुरु करण्याचं श्रेय जातं धर्मेंद्र यांनाच. १९६६ मध्ये ‘फूल और पत्थर’ या सिनेमात धर्मेंद्र यांचा शर्टलेस सीन होता. या सीनमध्ये धर्मेंद्र यांचं पीळदार शरीर पाहून प्रेक्षक फिदा झाले होते. धर्मेंद्र दिसायला इतके सुंदर की दिलीप कुमारही त्यांच्याविषयी म्हणाले होते की “अगर मुझे खुदा मिलें तो मैं शिकायत करूंगा कि हुजूर मेरा चेहरा धर्मेंद्र जैसा क्यों नहीं बनाया.”
हेमा मालिनींसह जोडी ठरली सुपरहिट
धर्मेंद्र म्हटलं की त्यांच्यासह एक नाव ओघाने येतंच. ते आहे हेमामालिनी यांचं. या दोघांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ते सगळे चित्रपट सुपरहिट ठरले. ७० च्या दशकात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं. यामुळे हेमा मालिनी यांच्या घरचेही त्रासले होते. कारण धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना चार मुलंही होती. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करावं हे त्यांच्या कुटुंबाला मुळीच वाटत नव्हतं. मात्र धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यात प्रेमाचे असे बंध तयार झाले होते की त्यांनी समाजाचा आणि कुटुंबांचा विरोध स्वीकारुन लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला सोडलं नाही. दोन्हीही नाती त्यांनी सांभाळली. एक जिंदादिल कलाकार म्हणून धर्मेंद्र त्यांचं संपूर्ण आयुष्य जगत आहेत. लॉकडाऊन मध्ये त्यांचे शेती करतानाचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. अशा या हरहुन्नरी कलावंताला वाढदिवसाच्या शुभेच्छा!