दिलीप कुमार(Dilip Kumar) यांनी ‘फूटपाथ’, ‘नदिया के पार’, ‘मुसाफिर’, ‘तराना’, ‘विधाता’, ‘मशाल’, ‘सुपर नानी’, ‘क्रांती’, ‘धर्म अधिकारी’, ‘द फोर्ट’, अशा अनेक चित्रपटांतून काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यामध्ये बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश आहे. धर्मेंद्र चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण कऱण्याआधीपासूनच दिलीप कुमार यांचे फार मोठे चाहते होते. धर्मेंद्र जेव्हा पंजाबमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांना वाटायचे ते व दिलीप कुमार हे एकमेकांचे भाऊ असून, ते बॉलीवूडवर राज्य करीत आहेत. त्यानंतर मुंबईला गेल्यावर ते थेट दिलीप कुमार यांच्या घरात गेले होते. हा किस्सा धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे.

तिथे सोफ्यावर गोरा, सडपातळ व देखणा….

दिलीप कुमार : द सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्रात धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले की, १९५२ साली जेव्हा मी लुधियानामध्ये शिक्षण घेत होतो. त्यावेळी मला दिलीप कुमार व मी भाऊ आहोत, असे वाटू लागले होते. मी एकदा मुंबईत आलो होतो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर पोहोचलो. तेथे गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता. त्यामुळे मी दिलीप कुमार यांच्या थेट घरात पोहोचलो. मला कोणीही थांबवण्यासाठी तिथे नव्हते. तर मी वरच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेलो. तिथे सोफ्यावर गोरा, सडपातळ व देखणा असा एक माणूस झोपलेला मला दिसला. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. मी त्यांच्याकडे पाहत असल्याची जाणीव होताच दिलीप कुमार झोपेतून जागे झाले. मला पाहताच ते थोडे घाबरले. त्यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला हाक मारली. त्यानंतर मी घाबरत जिना उतरलो आणि तिथून पळ काढला.

त्यानंतर सहा वर्षानंतर धर्मेंद्र यांनी एक स्पर्धा जिंकली. त्यावेळी इंडस्ट्रीमधील काही लोकांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी धर्मेंद्र यांनी दिलीप कुमार यांच्या बहिणीची भेट घेऊन अभिनेत्याची भेट घडवून आणण्याची विनंती केली. सहा वर्षांनंतर धर्मेंद्र यांची दिलीप कुमार यांच्याशी पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी मात्र धर्मेंद्रना आमंत्रण होते. निघताना दिलीप कुमार धर्मेद्र यांना वरच्या मजल्यावर घेऊन गेले आणि त्यांनी एक स्वेटर त्यांना दिला. कारण- थंडी होती आणि धर्मेंद्र यांनी एक पातळ कॉटनचा शर्ट घातला होता. येताना त्यांनी गळाभेट घेतली. “मला अजूनही त्या मिठीची उब जाणवते”, अशी आठवण धर्मेंद्र यांनी सांगितली.

दरम्यान, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर दिलीप कुमार व धर्मेंद्र हे एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.

Story img Loader