बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती द्रिशाशी साखरपुडा केला. आता करण आणि द्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची संभाव्य तारीखही जाहीर झाली आहे. करणच्या या लग्नावर त्याचे आजोबा धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करण आणि द्रिशा जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघेही १६ जून ते १८ जूनदरम्यान मुंबईत लग्न करणार आहेत. करणच्या लग्नासाठी त्याचे आजोबा धर्मेंद्र खूप उत्साही आहेत. धर्मेंद्र करणच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया देत म्हणाले, “खूप दिवसांनी कुटुंबात लग्न होत आहे. करण खूप छान आणि काळजी घेणारा मुलगा आहे. त्याला त्याची जोडीदार सापडली हे खूप छान आहे.”
करण आणि द्रिशाच्या प्रेमप्रकरणावरही धर्मेंद्र यांनी भाष्य केलं आहे. धर्मेंद्र म्हणाले, करणने पहिल्यांदा याबाबत त्याची आई पूजा देओलला सांगितलं होतं. पूजाने सनी देओलला सांगितलं आणि सनीने मला.” जर करण तिला पसंत करत असेल तर पुढे जाण्यात काहीच हरकत नाही. सनीने सांगितल्यानंतर मी द्रिशाला भेटलो. ती खूप हुशार आणि सुंदर मुलगी आहे आणि ती एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. मी करण आणि द्रिशासाठी खूप आनंदी आहे. त्यांना माझे आशीर्वाद आहेत. मी देओल कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करतो.”
हेही वाचा- “मी तुझं…” ; ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ धक्कादायक अनुभव
करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो अनिल शर्माच्या ‘अपने २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही दिसणार आहेत. देओलांच्या या तीन पिढ्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.