चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडते, चित्रपटाचे शूटिंग करताना कोणते किस्से घडतात, सहकलाकारांमध्ये कशा प्रकारे नातेसंबंध असतात, आपल्या आवडीचे कलाकार कसे जगतात, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. आता १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटाची धर्मेंद्र यांनी सांगितलेली आठवण चर्चेत आहे.
हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना यांनी आनंद ही भूमिका अजरामर केली आहे. या चित्रपटाचा आजही चाहतावर्ग आहे. त्यावेळी या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. मात्र, आनंद या भूमिकेसाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली पसंती धर्मेंद्र यांना होती. त्यांनी धर्मेंद्रला संपू्र्ण कथानक आणि भूमिकेविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनादेखील या चित्रपटात काम करायचे होते. मात्र, हृषिकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्रऐवजी राजेश खन्नांना या भूमिकेसाठी घेण्याचे ठरवले, त्यामुळे धर्मेंद्रला रागही आला आणि धोका दिल्यासारखेदेखील वाटले.
काय म्हणालेले धर्मेंद्र?
धर्मेंद्र यांनी नातवाच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जेव्हा त्यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांनी ‘आनंद’ चित्रपटाची आठवण सांगितली होती. त्यांनी म्हटले, “आम्ही बेंगलोरवरून परत येत होतो, त्यावेळी विमानात मला हृषिकेश दादाने ‘आनंद’ चित्रपटाची गोष्ट सांगितली होती. आपण हे असे करणार आहोत, वैगेरे मला सांगितले होते. नंतर मला कळले, राजेश खन्ना यांना मुख्य भूमिकेसाठी घेतले असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.”
पुढे ते म्हणतात, “हृषिकेश मुखर्जींच्या या निर्णयाचा मला राग आला होता. मी त्याला याबद्दल जाब विचारायचे ठरवले. मी मद्यपान केले होते आणि त्या नशेत मी त्याला रात्रभर फोन करत होतो. त्या रात्री मी त्याला झोपूच दिले नाही. मी त्याला विचारले, “तू मला ही भूमिका देणार होतास, मला संपूर्ण गोष्ट सांगितलीस, मग तू त्याला ती भूमिका का दिलीस?” हृषिकेश मुखर्जी मला सांगत राहिला, “धरम तू झोप, आपण सकाळी बोलू.” तो फोन कट करायचा आणि मी पुन्हा फोन लावून विचारायचो, “तू त्याला ती भूमिका का दिलीस?”, अशी आठवण धर्मेंद्र यांनी सांगितली होती.
हेही वाचा: बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानचे ब्रेकअप, तीन वर्षांनी बॉयफ्रेंडपासून झाली वेगळी, ‘हे’ ठरलं कारण
‘आनंद’ चित्रपटाच्या या कटू अनुभवानंतरही धर्मेंद्र आणि हृषिकेश मुखर्जी यांनी भूतकाळ विसरत ‘चुपके चुपके’ आणि ‘गुड्डी’ यांसारखे चित्रपट एकत्र केले आहेत.
दरम्यान, ‘आनंद’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव आणि सुमिता सन्याल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. एक महान हिंदी चित्रपट म्हणून आजही या सिनेमाचे कौतुक केले जाते.