अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला नुकतीच जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रसिद्ध मंडळींनी हजेरी लावली. ग्लोबल फेम गायिका रिहानादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी भारतात दाखल झाली आहे. एकूणच भारतातील हा अतिशय मोठा आणि शाही थाट असलेला लग्नसोहळा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामुळे संपूर्ण अंबानी परिवार चर्चेत आहे. सोशल मिडियावर अंबानी परिवाराबद्दल नवनव्या गोष्टी समोर येत आहेत.
खरेतर याआधीही अंबानी कुटुंबातील एका लग्न सोहळ्याची जबरदस्त चर्चा झाली ती म्हणजे अनंत अंबानीचे काका अनिल अंबानी व टीना मुनीम यांचे लग्न. अनिल अंबानी आणि टीना मुनीम यांचा प्रेमविवाह आणि यामुळेच त्यांचे लग्नदेखील तेव्हा चांगलेच चर्चेत आले होते. अंबानी कुटुंबाची धाकटी सून टीना मुनीम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला आहे. १९८३ मध्ये अमेरिकेत एका लग्नात अनिल यांनी प्रथम टीनाला पाहिले अन् पाहताक्षणी ते तिच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने त्यांची भेट घडवून आणली. १९८६ मध्ये ते दोघे पुन्हा एकमेकांना भेटले अन् तेव्हा प्रथमच टीना यांना अनिल यांचा साधेपणा भावला.
आणखी वाचा : बॉलिवूडमधील वर्णभेदावर अभिनेते दिव्येंदू भट्टाचार्य स्पष्टच बोलले; म्हणाले, “चक्क श्री कृष्णालासुद्धा…”
अनिल यांच्या काही मुलाखतीमध्ये त्यांनी या भेटीनंतरच त्यांना टीनाबद्दल आकर्षण वाटू लागल्याचं स्पष्ट केलं. मीडिया रीपोर्टनुसार अनिल यांचे वडील धीरूभाई अंबानी यांना टीनाचे चित्रपटक्षेत्राशी जोडलेले असणे खटकायचे. या क्षेत्रात असणाऱ्या मुली या सर्वसामान्य मुलींपेक्षा वेगळ्या असतात असा त्यांचा समज होता. यामुळे अनिल आणि टीना यांनी एकमेकांपासून दूर राहायचा निर्णय घेतला. अभिनय आणि चित्रपटसृष्टीला रामराम करून टीना या अमेरिकेत गेल्या अन् दोघांनी तब्बल ४ वर्ष एकमेकांना संपर्क केला नाही.
दरम्यान अंबानी यांच्याघरी अनिल यांच्यासाठी मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला होता, पण अनिल त्या मुलींना नकार देत असत. एकेदिवशी अमेरिकेत भूकंप झाल्याची बातमी अनिल यांनी पाहिली अन् ते फारच अस्वस्थ झाले, त्यांनी तातडीने टीना सुखरूप आहे का पाहण्यासाठी फोन केला. नंतर पुन्हा अनिल यांनी धीरूभाई अंबानी यांनी मनधरणी केली अन् अखेर त्यांनी टीना यांना आपली सून म्हणून स्वीकारण्यास होकारही दिला. यानंतर अनिल यांनी टीना यांना परत बोलावलं अन् आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली. तब्बल ५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोन्ही कुटुंबियांच्या आशीर्वादाने १९९१ च्या फेब्रूवारी महिन्यांत या दोघांनी लग्नगाठ बांधली. अनिल आणि टीना यांचे लग्नही अत्यंत थाटात पार पडले. त्यांच्याही लग्नात देशातील बरीच प्रतिष्ठित मंडळी आणि सेलिब्रिटीज यांनी हजेरी लावली होती.