अभिनेत्री दिया मिर्झाने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचा आजच्या काळातही एक वेगळा चाहतावर्ग आहे. यानंतर दिया ‘दम’, ‘भीड’, ‘थप्पड’, ‘ब्लॅकमेल’, ‘दिवानापण’, ‘संजू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. परंतु, इंडस्ट्रीत नवीन असताना दियासाठी हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याविषयी दियाने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
दियाने साधारण २२ वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हाचा काळ आणि इंडस्ट्रीत आज झालेले बदल यात प्रचंड फरक असल्याचं अभिनेत्रीने नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, “त्या काळात सेटवर जास्त स्त्रिया काम करत नव्हत्या. त्यामुळे आम्हाला काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आमच्या व्हॅनिटी व्हॅन प्रचंड लहान असायच्या. गाण्याचं किंवा चित्रपटातील एखादा सीन शूट करण्यासाठी आम्हाला विशिष्ठ एका परिसरात जावं लागायचं आणि त्याठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा नसायची. अशावेळी झाडांच्या किंवा खडकांच्या मागे जावं लागायचं. आमच्याबरोबर असणाऱ्या इतर तीन सहकारी महिला बाजूला चादर घेऊन उभ्या राहायच्या.”
हेही वाचा : “महिला पोलिसांनी गाडी अडवली अन्…”, अमोल कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाले, “ट्रिपल इंजिन…”
दिया पुढे म्हणाली, “स्वच्छतागृहचं नव्हे तर कपडे बदलताना सुद्धा गैरसोय व्हायची, अजिबात जागा नसायची. अशा परिस्थितीत महिलांचं खाजगी आयुष्य (प्रायव्हसी), वैयक्तिक स्वच्छता याबद्दलचे प्रश्न निर्माण व्हायचे. इंडस्ट्रीत एखादा पुरुष कलाकार सेटवर उशिराने आला, तर कोणीच एकही शब्द बोलायचं नाही. पण, जर एखाद्या महिला कलाकारामुळे शूटिंगला विलंब झाला, तर तिला अव्यावसायिक म्हणून संबोधलं जायचं. आता हळुहळू या सगळ्या परिस्थितीत बदल होताना पाहून समाधान वाटतं.”
हेही वाचा : Video : नव्या घरापाठोपाठ प्रार्थना बेहेरेने मुंबईत घेतलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह जोडीने केली पूजा, पाहा व्हिडीओ
दरम्यान, दिया मिर्झाप्रमाणे यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी भारतीय चित्रपट महोत्सवात एएनआयशी बोलताना, तर जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर पूर्वीच्या काळात उद्भवणाऱ्या स्वच्छतागृहांच्या समस्येबद्दल सांगितलं होतं.