बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी हे दोघेही १९८० मध्ये विवाहबंधनात अडकले. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्म बदलून दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. हेमा मालिनी आणि अमिताभ यांच्या ‘बागबान’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ चित्रपटाबाबत अभिनेत्रीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
हेमा मालिनी यांनी ‘लहरें रेट्रों’ यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, “दिग्दर्शक रवी चोप्रा या चित्रपटाबाबत सांगण्यासाठी माझ्या घरी आले होते. तेव्हा माझी आईसुद्धा बाजूला बसली होती. रवी चोप्रा गेल्यानंतर मी माझ्या आईला विचारले ४ मोठ्या मुलांच्या आईची भूमिका साकारायची आहे मी हे करू शकते का? यावर माझी आई मला म्हणाली होती, ‘तुला ही भूमिका करावीच लागेल कारण, चित्रपटाची कथा फार सुंदर आहे.’ यानंतर मी चित्रपटासाठी होकार कळवला होता.”
‘बागबान’मधील हेमा मालिनी आणि अमिताभ यांच्या जोडी प्रेक्षकांना फार आवडली. धर्मेंद्र यांनी अमिताभ-हेमा यांच्या सुंदर केमिस्ट्रीमुळे आजपर्यंत ‘बागबान’ पाहिलेला नाही आणि हा चित्रपट पाहण्यास नकार दिला असे बोलले जाते हे खरे आहे का? असा प्रश्न या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर त्या हसून म्हणाल्या, “मला याबाबत काहीच कल्पना नाही.” हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रवी चोप्रा दिग्दर्शित या सुपरहिट चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी, अमन वर्मा आणि समीर सोनी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या, “‘बागबान’ या चित्रपटासाठी माझ्या आईमुळे मी होकार दिला त्याप्रमाणे राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटाला मी माझ्या आईमुळे नकार दिला होता. तेव्हा राज कपूर माझ्या घरी आले होते ते मला म्हणाले होते, ‘मला माहिती आहे तुम्ही ही भूमिका करणार नाही तरीही माझी इच्छा आहे तुम्ही एकदा विचार करा.’ तेव्हा सुद्धा माझी आई बाजूला बसली होती. तिने मला ‘सत्यम शिवम सुंदरम’साठी शेवटपर्यंत परवानगी दिली नाही.”