Vicky Kaushal Chhaava Movie : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. सिनेमाच्या ट्रेलरने प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. या सिनेमात विकी कौशलसह अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुव्रत जोशी यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘छावा’बद्दल बोलताना सुव्रत सांगतो, “एकतर छत्रपती संभाजी महाराज यांच कार्य जगभरात माहिती व्हायला हवं आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहास हा लोकांना फारसा माहीत नाही. यामुळेच महाराजांच्या कार्याची महती प्रेक्षकांना समजावी म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी यावर चित्रपट करायचा ठरवला आणि मी या चित्रपटाचा एक भाग आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंद देणारी आहे. महाराजांच्या काळातल्या ऐतहासिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. लक्ष्मण सरांसारखा दिग्दर्शक आणि त्यांची काम करण्याची पद्धत कमालीची आहे. हिंदीत, मराठीत त्यांनी आजवर जे काम केलं ते उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या सोबतीने काम करून मला अनेक गोष्टी शिकता आल्या.”
सुव्रत पुढे विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना म्हणतो, “विकी कौशल हा कमालीचा अभिनेता आहे. सेटवर प्रचंड मेहनत करून त्याने ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबतीने काम करुन एक अभिनेता म्हणून अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकलो. चित्रपट करताना प्रत्येक सीन करण्यासाठी आम्ही सगळेच रिहर्सल करायचो आणि प्रत्येक कलाकार आपल्या सहकलाकाराच्या रिहर्सल सीनसाठी क्यू द्यायला उभा राहायचा. मेकअप, कॉस्ट्यूम, आर्ट सगळ्या टीमने अहोरात्र मेहनत करून चित्रपट तयार केला आहे. रायगडाचा सेट एकदा मांडला होता तेव्हा सेटवर फक्त ऐतिहासिक वेशभूषेतील कलाकार सेटवर होते. तेव्हा असं वाटलं की आपण खरोखर हा सगळा काळ जगतोय अनुभवतोय. भर उन्हात कशाचीही पर्वा न करता चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम काम केलं आणि फक्त भारतात नाही तर जगभरात हा चित्रपट पोहोचावा ही माझी इच्छा आहे”
दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला ‘छावा’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता सुव्रत जोशी ‘छावा’ सिनेमात नक्की काय भूमिका साकारणार हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. याशिवाय सध्या सुव्रत ‘वरवरचे वधू वर’ या नाटकात देखील भूमिका साकारत आहे.