आज बॉलिवूडमध्ये ‘एबीसीडी’ किंवा ‘स्ट्रीट डान्सर’सारखे नृत्यावर बेतलेले चित्रपट लोकप्रिय होत आहेत. हॉलिवूडमध्येसुद्धा ‘स्टेप अप’सारख्या चित्रपटातून असे प्रयोग झाले आहेत, पण भारतात अशा चित्रपटाचा पहिला यशस्वी प्रयोग होता तो म्हणजे ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट. शाहरुख खान, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाला नुकतीच २५ वर्षं पूर्ण झाली आहेत.
या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली आणि त्या गाण्यावरील नाचही चांगलेच गाजले. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक खूप वेगळं आव्हान होतं. आज याच चित्रपटाबद्दल कोरिओग्राफर श्यामक दावर यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. या चित्रपटाचा परिणाम आजही चित्रपटसृष्टीवर जाणवतो असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : समांथाला झालेला मायोसायटिस हा गंभीर आजार नेमका आहे तरी काय? शरीरावर याचा काय परिणाम होतो?
याबद्दल बोलताना श्यामक दावर भावुक होऊन म्हणाले, “२५ वर्षं… मला तर १५ वर्षं पूर्ण झाल्यासारखीच वाटतायत, या चित्रपटाला एवढी वर्षं झाली आहेत हे माझ्यासाठी अविश्वसनीयच आहे.” या चित्रपटातून आपल्या आयुष्यातील जोडीदार यावर यश चोप्रा यांनी भाष्य केलं आणि ही प्रेमकहाणी मांडताना त्यांनी नृत्य या माध्यमाचा योग्य वापर केला. या चित्रपटासाठी सर्वोत्तम कोरिओग्राफरचा राष्ट्रीय पुरस्कारही श्यामक यांना मिळाला होता.
श्यामक म्हणाले. “या चित्रपटामुळे नृत्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला. या चित्रपटामुळे इंडस्ट्रीमधील नृत्यपद्धतीत खूप मोठा बदल झाला असं आजही कित्येक लोक म्हणतात. त्यावेळी माझ्या भावना वेगळ्या होत्या, पण आज इतक्या वर्षांनी लोक असं का म्हणत आहेत याची जाणीव झाली आहे.” असं म्हणत श्यामक यांनी यश चोप्रा आणि इतर कलाकारांचे आभार मानले. शिवाय श्यामक म्हणाले की, “हा चित्रपट एक ट्रेंड सेट करणारा होता, आणि मी त्याचा एक अविभाज्य भाग होतो याचा मला आनंद आहे. हा चित्रपट पुन्हा बनवायचा झाल्यास तो माझ्याशिवाय बनूच शकत नाही, कारण दिल तो पागल है म्हणजे मी असं समीकरण रूढ झालं आहे.”