बॉलिवूडचा ट्रॅजडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेते दिलीप कुमार यांची आज जयंती. ७ जुलै २०२१ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आज दिलीप कुमार असते तर त्यांची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू असती. भारतीय चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन पासून शाहरुख खानपर्यंत कित्येक अभिनेत्यांनी दिलीप कुमार यांच्याच पावलावर पाऊल ठेवलं. यूसुफ खान ते दिलीप कुमार हा त्यांचा प्रवास कसा होता याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण दिलीप कुमार यांचं पुण्याशी खास नातं होतं याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार दिलीप कुमार हे १९४० मध्ये पुण्यात चक्क एका ठेल्यावर सँडविच विकायचे. पुण्याच्या वृत दर्शनच्या शैलेश गुजर यांच्याशी एका कार्यक्रमात संवाद साधताना खुद्द दिलीप कुमार यांनीच या गोष्टीचा खुलासा केला होता शिवाय या शहराशी त्यांचं वेगळं असं नातं आहे हेदेखील त्यांनी सांगितलं होतं.
आणखी वाचा : सुशांत सिंग राजपूतचा मुंबईतील फ्लॅट अडीच वर्षं आहे रिकामा; रीअल इस्टेट ब्रोकरने सांगितलं यामागील कारण
दिलीप कुमार म्हणाले, “पुणे शहराने मला माझी पहिली १०० रुपये कमाई दिली. माझ्या वडिलांशी वाद झाल्यानंतर मी पुण्यात आलो आणि पुण्याच्या आर्मी कॅंटीन कॅम्पजवळ मी एक स्टॉल लावला आणि चक्क सँडविच विकली.” शिवाय हीच सँडविच विकून त्यांनी पैसे साठवले आणि त्यांनी स्वप्नांचं शहर गाठलं.
ही आठवण सांगताना दिलीप कुमार म्हणाले, “सँडविच विकून मी तब्बल ५००० रुपये साठवले आणि थेट मुंबई शहर गाठलं. पण पुणे शहरात सँडविच विकून मिळवलेले १०० रुपये मी कधीच विसरणार नाही. त्या १०० रुपयांमुळे मला खूप आनंद मिळाला.” भारतीय चित्रपटसृष्टीच्या या कोहिनूरने ७ जुलै २०२१ या दिवशी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ५ दशकाच्या कारकिर्दीत त्यांनी ६५ चित्रपटात काम केलं. १९९८ साली पाकिस्तान सरकारनेही त्यांना खास पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.