दिवंगत अभिनेते दिलीप कुमार व मधुबाला यांच्या प्रेमकहाणीची आजही चर्चा होते. त्यांच्या नात्यात अनेक चढउतार आले आणि शेवटी ते वेगळे झाले. दिलीप कुमार व मधुबाला यांची भेट १९५१ मधील ‘तराना’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आधी दोघांची मैत्री झाली, नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘मुघल-ए-आझम’ होय. पण या चित्रपटावेळी त्यांचं नातं संपलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

के आसिफ यांच्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं नातं संपलं होतं. त्यांच्या ब्रेकअपची अनेक कारणं होती, ज्यात मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्या नात्यात हस्तक्षेप करणं आणि नंतर ‘नया दौर’ चित्रपटादरम्यानचं कायदेशीर प्रकरण. चित्रपट निर्माते बीआर चोप्रा यांनी मधुबालावर गुन्हा दाखल केला होता आणि दिलीप कुमार यांना साक्षीदार बनवलं होतं. हे कायदेशीर प्रकरण त्यांच्यातील नाते संपुष्टात येण्याचे सर्वात मोठे कारण ठरले. मधुबालाने चित्रपट साइन केल्यानंतर काम करण्यास नकार दिल्याने निर्मात्यांनी कायदेशीर कारवाई केली होती.

दिलीप कुमार व मधुबाला यांनी नातं संपल्यावरही ‘मुघल-ए-आझम’मध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान दिलीप कुमार यांनी मधुबालाला जोरदार झापड मारली होती. खरं तर, सीन असा होता ज्यात सलीम अनारकलीला झापड मारतो, पण ज्या प्रमाणे दिलीप कुमार यांनी मधुबालाला झापड मारली ते पाहून त्यांनी राग काढला, असं दिग्दर्शकाचं म्हणणं होतं.

सेटवर पसरली होती शांतता

या प्रसंगाचा उल्लेख खतीजा अकबर यांच्या ‘आय वॉन्ट टू लिव्ह: द स्टोरी ऑफ मधुबाला’ या पुस्तकात करण्यात आला आहे. ‘मुघल-ए-आझम’धील या दोघांचे सहकलाकार अजित यांनी ही गोष्ट सांगितली होती. अजित यांनी दिलीप यांच्याबरोबर ‘नया दौर’मध्येही काम केलं होतं. दिलीप यांनी मधुबाला यांना खूप जोरात मारलं होतं. शॉट ओके झाला, पण जे घडलं ते पाहून सेटवर शांतता पसरली होती.

दिलीप कुमार व मधुबाला (फोटो – स्क्रीनशॉट)

दिग्दर्शक काय म्हणाले होते?

अजित यांनी सांगितलं होतं की या सीननंतर मधुबालाला धक्का बसला आणि ती स्तब्ध झाली होती. दिग्दर्शक के. आसिफ तिच्याकडे धावत गेले आणि तिला म्हटलं की ब्रेकअप झाले असले तरी दिलीप अजूनही तुझ्यावर प्रेम करतात याचा पुरावा ती झापड आहे. “मी आज खूप आनंदी आहे कारण तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो हे स्पष्ट झालंय. प्रेमात पडलेल्या माणसाशिवाय दुसरं कोण असं करू शकतं? तो तुझ्यावर प्रेम करत होता आणि अजूनही करतो, हेच यातून सिद्धत होतं,” असं के आसिफ मधुबालाला म्हणाले होते. मात्र, दिग्दर्शकाच्या या बोलण्याचा मधुबालावर काहीच परिणाम झाला नाही. ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम होतं, तिने अभिनयाच्या बहाण्याने झापड मारल्याचा तिला धक्का बसला होता.

दिलीप कुमार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांना त्यांचं लग्न म्हणजे बिझनेस डील करायची होती. म्हणजे लग्नानंतर दिलीप आणि मधुबाला दोघेही त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीसाठी काम करतील, असं त्यांचं म्हणणं होतं. “मी त्या दोघांना समजावून सांगितलं की, माझी काम करण्याची आणि प्रोजेक्ट निवडण्याची वेगळी पद्धत आहे आणि माझे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस असले तरीही मी कोणतीही हलगर्जीपणा करणार नाही. यामुळे कदाचित त्यांनी मी उद्धट आणि अहंकारी आहे हे त्याने मधुला पटवून दिलं,” असं दिलीप कुमार म्हणाले होते.

दिलीप कुमार व मधुबाला यांच्या नात्यात नंतर प्रचंड कटुता आली होती. दोघांनी एकमेकांशी बोलणं सोडलं होतं. मधुबाला यांनी त्यांच्या निधनाच्या आधी दिलीप कुमार यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती, ती पूर्ण करायला दिलीप कुमार गेले होते. त्यांनी स्वतः त्यांच्या पुस्तकात याबद्दल माहिती दिली होती. सायरा बानो यांनीही याबद्दल कोणताच आक्षेप घेतला नव्हता आणि दिलीप कुमार यांना मधुबालाला भेटायला जाण्यास सांगितलं होतं.