पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या आपल्या कॉन्सर्ट्समुळे चर्चेत आहेत. तो नेहमीच आपल्या कार्यक्रमांमध्ये गाण्यांव्यतिरिक्त चर्चेत असणाऱ्या गोष्टींवर भाष्य करतो. त्याने त्याच्या कॉन्सर्टमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पाची स्टाईल करून दाखवली आहे तर बंगळुरू येथील कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणला बोलावत तिचे कौतूक केले यामुळे त्याच्या कॉन्सर्टची चर्चा झाली. त्याआधी त्याने दारूविषयक गाण्यांवरून विविध राज्यातील सरकारला प्रत्युत्तर दिले होते. आता मात्र त्याने त्याच्या कॉन्सर्टमध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
दिलजीत दोसांझने त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्मरण केले. दिलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात दिलजीतने त्याच्या एक कॉन्सर्ट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समर्पित केला आहे. त्याने या व्हिडीओत सांगितले की, “आजचा कार्यक्रम देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समर्पित आहे.” दिलजीतने डॉ. मनमोहन सिंग यांच्या साध्या जीवनशैलीचे कौतुक केले आणि सांगितले की, “त्यांनी नेहमीच साधं जीवन जगलं, कधी कोणाला उलट उत्तर दिलं नाही, आणि कोणत्याही वाईट गोष्टीत सहभागी झाले नाहीत, हे सर्व राजकारणात राहून करणे जवळजवळ अशक्य आहे.”
दिलजीत दोसांझने यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी अनेकदा म्हटलेली एक शायरी सादर केली. तो म्हणाला, “हजारों जवाबों से मेरी खामोशी अच्छी, ना जाने कितने सवालों की आबरू ढक लेती है.” याबरोबरच त्याने आजच्या पिढीला डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, “माझ्यासह आपण सर्वानी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून एक गोष्ट शिकायला हवी ती म्हणजे आपल्याला कोणीही किती वाईट बोललं तरी आपण त्याचं उत्तर न देता आपल्या कामावर लक्ष देत ते काम चांगल करायला हवं.” डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिल्यामुळे दिलजीत दोसांझ यांचे खूप कौतुक होत आहे. त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा…२०२५ मध्ये बॉलीवूडमध्ये असणार स्टारकिड्सचा बोलबाला, नव्या वर्षात सिनेसृष्टीत दिसणार यंग ब्रिगेड
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नुकतेच निधन झाले. ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली. २६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक राजकीय नेते, खेळाडू, आणि बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कार्याची आठवण काढली.