गायक दिलजीत दोसांझचा इंदूरमधील कॉन्सर्ट रद्द करावा या मागणीसाठी बजरंग दलाने आंदोलन केलं होतं. पण तरीही रविवारी त्याचा कॉन्सर्ट इंदूरमध्ये पार पडला. या कॉन्सर्टमध्ये दिलजीतने मूळचे इंदूरचे दिवंगत उर्दू कवी राहत इंदोरी यांच्या काही शायरी आपल्या कॉन्सर्टमध्ये म्हटल्या. त्याने बजरंग दलचा थेट उल्लेख केला नाही, पण हे त्यांनाच उत्तर देण्यासाठी असल्याची चर्चा रंगली आहे. दिलजीतचे कॉन्सर्टमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दिलजीतने या निषेधाला गझलच्या माध्यमातून उत्तर दिलं. त्याने दिल-लुमिनाटी टूर कॉन्सर्टमध्ये इंदोरींची सर्वात प्रसिद्ध शायरी “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है” (हिंदुस्थान कोणाचीही मालमत्ता नाही) म्हटली.
“अगर खिलाफ हैं होने दो, जान थोडी है
ये सब धुआं है आसमां थोडी है
सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है’,” असं दिलजीत म्हणाला.
रविवारी बजरंग दलाने कॉन्सर्ट न होऊ देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली होती. “दिलजीतने शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक वेळा देशविरोधी वक्तव्ये केली आहेत. तो खलिस्तान समर्थकही आहे. अशा व्यक्तीला आम्ही माँ अहिल्या नगरीत कार्यक्रम करू देणार नाही. शो रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज आम्ही प्रशासनाकडे दिला आहे. त्यानंतरही कॉन्सर्ट झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू,” असं बजरंग दलाचे नेते अविनाश कौशल म्हणाले होते.
इंदूर येथील बजरंग दलाचे नेते तन्नू शर्मा इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले, “आमचा विरोध ड्रग्जच्या सेवनाला असून कॉन्सर्टला नाही. अशा कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचे सेवन करणे आपल्या संस्कृतीत नाही; आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आम्ही दारू पिण्याच्या विरोधातही आहोत. या कॉन्सर्टमध्ये असे अनेक स्टॉल होते.”
#WATCH | Indore, Madhya Pradesh | Bajrang Dal workers hold protest against the concert of actor-singer Diljit Dosanjh. (07.12) pic.twitter.com/LGtAX50vpT
— ANI (@ANI) December 7, 2024
तिकिटांच्या काळा बाजाराबद्दल दिलजीत म्हणाला…
दिलजीतने त्याच्या कॉन्सर्टमध्ये बजरंग दलाचा उल्लेख केला नाही. पण त्याच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार होतो, त्याला तो कसा जबाबदार आहे, असा सवाल त्याने केला. “खूप दिवसांपासून या देशातील लोक म्हणत आहेत की दिलजीतच्या कॉन्सर्टची तिकिटं ब्लॅकमध्ये विकली जातात. पण तिकिटांचा काळाबाजार होणं ही माझी चूक नाही. १० रुपयांचे तिकीट १०० रुपयांना विकले जाते, यात कलाकाराची चूक कशी?” असा प्रश्न दिलजीतने विचारला.
दिलजीतने त्यानंतर राहत इंदोरी यांची आणखी एक शायरी म्हटली.
“’मेरे हुजरे में नहीं और कही पर रख दो
आसमान लाये हो, ले आओ जमीन पर रख दो
अब कहां धुंढने जाओगे हमारे कातील आप,
तो कत्ल का इलज़ाम हमीं पर रख दो.’
“तुम्हाला माझी जेवढी बदनामी करायची आहे तेवढी करा, मला कुणाची भीती वाटत नाही,” असं दिलजीत म्हणाला.
“हा स्वतंत्र संगीताचा काळ आहे. बदल घडताना अडचणी येणारच. पण आम्ही काम करत राहू. सर्व स्वतंत्र कलाकारांनो, तुमचे प्रयत्न दुप्पट करा. ही भारतीय संगीताची वेळ आहे. पूर्वी परदेशी कलाकार यायचे आणि त्यांची तिकिटं लाखात विकली जायची. आता भारतीय कलाकारांची तिकिटं ब्लॅकमध्ये विकली जातात. यालाच ‘वोकल फॉर लोकल’ म्हणतात,” असं दिलजीत म्हणाला.