लोकप्रिय गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या ‘DIL-LUMINATI TOUR 24 ‘ मुळे चर्चेत आहे. रविवारी (१७ नोव्हेंबर रोजी) दिलजीतचा गुजरातमधील अहमदाबाद इथे कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये त्याच्या दारूवरील गाण्यांवरून आलेल्या नोटिसबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली.
दिलजीतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्याच्या दारूवरील गाण्यांवरून होणाऱ्या वादावर त्याने उत्तर दिलं आणि सरकारला आव्हान दिलं. दिलजीत म्हणाला, “एक आनंदाची बातमी आहे, आज मला कोणतीही नोटीस आलेली नाही. यापेक्षा मोठी आनंदाची बातमी आणखी एक आहे. आजही मी दारूवरचं एकही गाणं गाणार नाही. विचारा की का नाही गाणार? कारण गुजरातमध्ये दारूबंदी आहे.”
हेही वाचा- “ही वाईट वृत्ती आहे” म्हणत ऐश्वर्या रायने खेकड्यांशी केलेली फिल्म इंडस्ट्रीची तुलना
माझ्या धार्मिक गाण्याबद्दल कुणीच बोलत नाही – दिलजीत
पुढे दिलजीत म्हणाला, “मी एक डझनहून जास्त धार्मिक गाणी गायली आहेत. मागच्या १० दिवसांत मी दोन धार्मिक गाणी काढली आहेत, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. प्रत्येकजण पटियाला पेग याच गाण्याबद्दल बोलत आहे. एक अँकर टीव्हीवर म्हणत होता की ‘जर अभिनेत्याने तुम्हाला दारूबद्दल म्हटलं तर तुम्ही त्याला बदनाम कराल, पण दारूचं गाणं गाणाऱ्या गायकाला तुम्ही लोकप्रिय करताय.’ मी कोणालाच फोन करून म्हणत नाहीये की तुम्ही दारू प्यायलात की नाही ते. मी फक्त गाणं गातोय. बॉलीवूडमध्ये दारूवर हजारो गाणी बनली आहेत आणि माझी जास्तीत जास्त २-४ गाणी असतील. मी तीही गाणार नाही. आजही ती गाणी मी गाणार नाही.”
हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
बॉलीवूड कलाकार दारूची जाहिरात करतात – दिलजीत
दिलजीतने या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड कलाकारांवर टीका केली. “गाणी ट्विस्ट करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. कारण मी स्वतः दारू पित नाही. मात्र बॉलीवूड कलाकार दारूची जाहिरात करतात, दिलजीत दोसांझ जाहिरात करत नाही. त्यामुळे मला त्रास देऊ नका. मी जिथे जातो तिथे शांततेत इव्हेंट करतो आणि निघून जातो. तुम्ही का त्रास देताय मला? चला एक चळवळ सुरू करुयात. एवढे लोक असतील एक चळवळ नक्कीच सुरू होऊ शकते. जर सगळ्या राज्यांनी दारूबंदीची घोषणा केली, तर मी आयुष्यात कधीच दारूवरचं गाणं गाणार नाही,” असं दिलजीत म्हणाला.
करोना काळात दारूची दुकान चालू होती – दिलजीत
करोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय बंद असूनही दारूची दुकानं चालू होती, याकडे दिलजीतने लक्ष वेधले. “खूप जास्त रेव्हेन्यू मिळतो. करोना काळात सगळं बंद होतं, पण दारूची दुकानं चालू होती. तुम्ही तरुणांना मूर्ख नाही बनवू शकत. यापेक्षा एक चांगली ऑफर देतो. जिथे जिथे माझे शो आहेत, तिथे तुम्ही एक दिवस ‘ड्राय डे’ घोषित करा, मी दारूवरचं गाणं गाणार नाही. माझ्यासाठी गाणी ट्विस्ट करणं सोपं आहे, मी नवीन कलाकार नाही, ज्याला तुम्ही म्हणाल ‘तू हे गाणं गाऊ शकत नाही, ते गाऊ शकत नाही’ आणि मी म्हणेन, ‘अरे आता मी काय करू’. मी गाणं ट्विस्ट करेन,” असं दिलजीत म्हणाला.
“गुजरातमध्ये ‘ड्राय स्टेट’ आहे, असं काहीजण म्हणतायत. ते खरं असेल तर मी त्यांचा चाहता झालोय. मी गुजरात सरकारचं जाहीर समर्थन करतोय. माझी तर इच्छा आहे की आमचं पवित्र शहर अमृतसरमध्ये दारूबंदी व्हावी. चला आता सुरू करा ही मोहीम. मी दारूवरची गाणी गाणं बंद करतो, तुम्ही देशभरातील दारूची दुकानं बंद करा. माझी ४-५ दारूवरची गाणी आहेत ती नाही गाणार किंवा ट्विस्ट करेन. उगाच का त्रास देताय”, असं दिलजीत दोसांझ म्हणाला.
दिलजीतला तेलंगणा सरकारने पाठवली होती नोटीस
दिलजीत दोसांझने हैदराबादमध्ये कॉन्सर्ट केला, तेव्हा त्याला तेलंगणा सरकारने नोटीस पाठवली होती. आपल्या गाण्यातून तो दारूचा प्रचार करतोय, त्यामुळे त्याने दारूवरील गाणी गाऊ नये असं म्हटलं होतं. आता दिलजीतने अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये त्या नोटिसवर प्रतिक्रिया देत टीका केली आणि सरकारला आव्हान दिलं.
© IE Online Media Services (P) Ltd