Diljit Dosanjh Live Concert : पंजाबी प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ आणि त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याची ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’ जगभरात सुरू आहे. या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी दिलजीतचे कॉन्सर्ट होतं आहेत. भारतात दिल्लीपासून ‘दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४’मधील कॉन्सर्टची सुरुवात झाली. त्यानंतर जयपूर, हैदराबाद आणि लखनऊ या ठिकाणी दिलजीतचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. नुकताच दिलजीतचा पुणे येथे लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दिलजीत दोसांझचा ( Diljit Dosanjh ) पुण्यातील लाइव्ह कॉन्सर्टची खूप चर्चा झाली. कोथरुड परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या दिलजीतच्या कॉन्सर्टला राजकीय पक्षांसह संस्था, संघटनांनी तीव्र विरोध केला. संस्कृती बिघडवणारा कार्यक्रम रद्द करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या. त्यानंतर कॉन्सर्टमधील मद्यविक्री थांबविण्यात आली. असं असलं तरी दिलजीत लाइव्ह कॉन्सर्ट जोरदार पार पडला. यावेळी दिलजीतने मराठीत संवाद साधला. याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे.
‘पुणे कल्चर’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिलजीत दोसांझचा ( Diljit Dosanjh ) पुण्यातील कॉन्सर्टमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीत मराठीत बोलताना दिसत आहे. तो म्हणतो, “कसे आहात पुणेकर? दिलजीत दोसांझ आला हो…मुलगी शिकली प्रगती झाली.” दिलजीतचा या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या चित्रपटात, पोस्ट करत म्हणाली, “तुमच्या आशीर्वादाची गरज…”
दरम्यान, दिलजीत दोसांझच्या ( Diljit Dosanjh ) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “पैसे मिळाल्यावर एवढं तरी विचारावं लागतंच.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, मराठी छान आहे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “विषय संपला शेठ.”