नव्वदच्या दशकातील काही मॉडेलपैकी एक मॉडेल म्हणजे डिनो मोरिया (Dino Morea). त्याने मॉडेलिंगबरोबरच चित्रपटांमध्येही आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. डिनोच्या करिअरपेक्षा त्याचं लव्ह लाईफ चांगलंच चर्चेत राहिलं. यात बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूचं (Bipasha Basu) नावदेखील घेतलं जातं. १९९६ पासून डिनो आणि बिपाशा एकमेकांना डेट करत होते. पण २००२ मध्ये हे दोघे काही कारणाने वेगळे झाले. मात्र या दोघांच्या ब्रेकअपचं नेमकं कारण काय होतं? याबद्दल नुकतंच डिनोने भाष्य केलं आहे.

डिनो मोरियाची बिपाशा बासूबरोबरच्या ब्रेकअपबद्दल कबुली

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत डिनोने (Dino Morea) बिपाशाबरोबरच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आणि कबूल केले की, त्याने स्वत:च तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. बिपाशाला (Bipasha Basu) तेव्हा परिस्थितीचा सामना करणं खूप कठीण जात होतं आणि ब्रेकअपनंतर लगेचच ‘राज’ चित्रपटाचे चित्रीकरण करणेही तिच्यासाठी सोपे नव्हते. याबद्दल डिनोने भाष्य केलं आहे. तसंच त्याने सध्याच्या नात्याबद्दलही भाष्य केलं.

“मीच बिपाशापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला”

यावेळी डिनोने (Dino Morea) असं म्हटलं की, “‘राज’च्या काळात आम्ही वेगळे झालो होतो. खरे सांगायचे तर, आमच्यातील काही समस्यांमुळे मीच बिपाशापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिला खूप त्रास होत होता. ती नाराज होती आणि यामुळेच तिला रोज भेटणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. आम्ही आमचं नातं सुधारण्याचा प्रयत्नही केला, पण ते शक्य होत नव्हते. यामुळे, आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला.”

डिनो मोरियाचा सध्याच्या नात्याबद्दलही खुलासा

याच मुलाखतीत डिनोला (Dino Morea) त्याच्या सध्याच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो हसला आणि म्हणाला, ‘प्रेम करणं चांगलं असतं. तुम्ही जितके जास्त प्रेम वाटाल, तितके जास्त प्रेम तुम्हाला मिळेल. कारण प्रत्येकाला असं वाटतं की, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं”. मात्र यावेळी डिनोने त्याच्या प्रियसीबद्दलचा काहीच खुलासा केला नाही. त्यामुळे आता त्याची नवीन साथीदार कोण आहे? हे गुलदस्त्यात आहे.

डिनो मोरियाच्या कामाबद्दल…

दरम्यान, डिनोच्या (Dino Morea) कामाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही काळापासून तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसत आहे. बॉलीवूडमध्ये, तो शेवटचा २०१५ मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता तो लवकरच ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे.