‘माझी तुझी रेशीमगाठी’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेमधील प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांची केमिस्ट्री सर्वांना आवडलीच पण त्याचबरोबर छोट्या परीने म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. आता करण जोहरला देखील तिची भुरळ पडली आहे.
करण जोहर सध्या त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. तर या त्याच्या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. तर त्यानंतर या चित्रपटातील गाणी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातील एका गाण्यावर मायराने डान्स केला, जो करणला खूप आवडला.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं काही दिवसांपूर्वीव प्रदर्शित झालं. हे गाणं सर्वांना खूप आवडत असून या गाण्याचे रील्स सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहेत. मायराने देखील या गाण्यावर ताल धरला. मायराने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, त्या व्हिडीओमध्ये ती आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्या ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर नाचताना दिसली. मायराचा हा व्हिडीओ करण जोहरनेही पाहिला आणि तो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. तर हा तिचा व्हिडीओ धर्मा प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरूनही शेअर करण्यात आला. त्यानंतर करण जोहरने शेअर केलेला स्टोरीचा स्क्रीनशॉट मायराने शेअर करत आनंद व्यक्त केला आणि करणचे आभार मानले.
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.