“सबका बदला लेगा तेरा फैजल”, २०१२ मध्ये ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ प्रदर्शित झाला आणि नवाजुद्दिनने साकारलेल्या फैजलसह आणखी एक नाव घरोघरी प्रसिद्ध झालं ते म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यप. १० सप्टेंबर १९७२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जन्मलेला अनुराग १९९३ मध्ये मुंबईत असंख्य स्वप्न उराशी घेऊन आला. त्याने २००३ मध्ये दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, त्याचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. त्यानंतर अनुरागचे ‘देव डी’, ‘गुलाल’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’मुळे अनुराग कश्यप हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘आऊट ऑफ द बॉक्स’ चित्रपट, चौकटीबाहेरच्या ओटीटी वेब सीरिज, वादग्रस्त विषयांची उत्तम हाताळणी या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुरागच्या कलाकृतीत पाहायला मिळतात. एक दिग्दर्शक म्हणून आपण त्याच्या असंख्य कलाकृती पडद्यावर पाहिल्या आहेत आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त अनुराग कश्यपबद्दलचे कधीही न ऐकलेले किस्से जाणून घेऊयात…
हेही वाचा : रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ला एक वर्ष पूर्ण, दुसरा भाग केव्हा प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने शेअर केली झलक
‘सेक्रेड गेम्स’मध्ये ‘कुकू’ची भूमिका तृतीयपंथीयाने करावी…
‘सेक्रेड गेम्स’ सीरिजच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये नवाजने ‘गणेश गायतोंडे’ हे पात्र साकारलं होतं. नवाजच्या प्रमुख भूमिकेसह यामधील ‘कुकू’च्या भूमिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. ‘कुकू’च्या भूमिकेसाठी अनुरागला एका तृतीयपंथीय अभिनेत्याची निवड करायची होती. यासाठी ‘सेक्रेड गेम्स’च्या टीमने अनेक तृतीयपंथीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी नकार दिल्यामुळे अखेर ही भूमिका अभिनेत्री कुब्रा सैतने साकारली.
अनुराग कश्यपला सौदी अरेबियात झाली होती अटक
अनुराग कश्यपने ‘अनफिल्टर्ड’ या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. “डेन्मार्कला असताना तेथील नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण विमानसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मी ट्रेनने रोमला गेलो. जास्तीच्या प्रवासामुळे मला प्रचंड थकवा आला होता. अशा परिस्थितीत मी वाईन प्यायलो. रोमवरून मी सौदीला जाण्यासाठी विमान तिकीट बुक केलं. परंतु, विमानासाठी पाच तास बाकी असल्याने मी विमानतळावरील लॉंचमध्ये बसून खूप दारू प्यायलो. पुढे, सौदी पर्यंतचा प्रवास केला आणि विमान लॅंड झाल्यावर मी पूर्णत: नशेमध्ये असल्याने मला सौदीच्या पोलिसांनी अटक केली.” असं अनुराग कश्यपने सांगितलं.
हेही वाचा : “‘जय मल्हार’, ‘विठू माऊली’…”, कोठारे व्हिजन्स का देतंय धार्मिक मालिकांवर भर? आदिनाथ कोठारेने सांगितलं कारण…
अनुरागने सौदीच्या विमानतळावर चौकशी सुरु झाल्यावर यासंदर्भात रॉनी स्क्रूवाला याला मेसेज करून निरोप दिला होता. तसेच चौकशी दरम्यान त्याच्या बॅगेत पोर्क सॉसेजेस असल्याने तो आणखी घाबरल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी जेट एअरवेजचे अधिकारी स्वत: अनुराग कश्यपला घ्यायला आले होते. मात्र, सौदी अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला आणि जेट एअरवेजने अनुरागशिवाय उड्डाण करण्यास नकार दिल्याने विमान उड्डाणाला तब्बल तीन तास उशीर झाला. तीन तासांनंतर प्रकरण शांत झालं आणि अखेर सौदी पोलिसांनी अनुरागला जाण्याची परवानगी दिली.
अनुराग कश्यप आणि त्याचे मोजे ( सॉक्स )
अनुराग कश्यप नेहमी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले मोजे वापरतो. ज्या मोज्यांचा कलाविश्वाशी किंवा चित्रपटांशी काहीच संबंध नाही असे मोजे (सॉक्स) तो वापरत नाही. याचं उदाहरण सांगायचं झालं, तर एका मुलाखतीत अनुरागला त्याच्या शूजमधील मोजे खूप सुंदर असल्याचं सांगितलं यावर दिग्दर्शक म्हणाला, “हे मोजे ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटशी संबंधित आहेत. चित्रपटाशी काहीच संबंध नसलेले मोजे मी वापरत नाही.”
हेही वाचा : “माझे चित्रपट पॉर्नसारखे पाहिले जायचे”, अनुराग कश्यपचे विधान; म्हणाला, “माझ्या नैतिकतेवर…”
पैशांची बचत किंवा गुंतवणूक करणे पटत नाही…
सामान्य माणसं म्युच्युअल फंड किंवा बॅंकेत पैशांची गुंतवणूक करतात. पण, अनुराग कश्यपचा पैशांची बचत करणं, पैसे साठवणं, म्युच्युअल फंड या गोष्टींवर विश्वास नाही. “तुमचा मुलगा लायक असेल, तर स्वत: पैसे कमावेल आणि लायक नसेल, तर खर्च करेल. असं असताना पैसा साठवण्याची गरज काय? माझ्या वडिलांनी मला चांगलं शिक्षण दिलं, त्यानंतर स्वकष्टाने जगायचं कसं हे शिकवलं. आज माझी मुलंही स्वतंत्र आहेत मग, मी पैसे का साठवू?” हे अनुराग कश्यपचं तत्व असल्याने पैसे साठवणं किंवा गुंतवणूक करणं त्याला पटत नाही.