बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या आगामी ‘ऑल्मोस्ट लव विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाचं मोरक्को येथील मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग पार पडलं. यावेळीस दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटातील कलाकारांसह हजेरी लावली. यादरम्यान त्याने ‘इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
अनुराग कश्यप हा सोशल मीडिया आणि खासकरून ट्विटरवर चांगलाच सक्रिय असतो. मध्यंतरी त्याने काहीकाळ ट्विटरपासून फारकत घेतली होती. अनुरागने त्याची राजकीय मतं आणि विचार ट्विटरवर मांडल्याने त्याला बरंच ट्रोल केलं गेलं होतं, शिवाय याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. तो बराच काळ नैराश्यात होता शिवाय त्याच्या मुलीबाबतही बरंच बोललं जात होतं.
आणखी वाचा : ‘कांटा लगा’फेम अभिनेत्री साकारणार सेक्स वर्करची भूमिका; म्हणाली, “ती वस्ती घाण आहे असा…”
याविषयी बोलताना अनुराग म्हणाला, “माझ्या ट्वीटमुळे माझ्या मुलीला प्रचंड ट्रोल केलं जात होतं, तिला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये मी ट्विटर बंद केलं आणि पोर्तुगालमध्ये शूटिंगसाठी गेलो. नंतर जेव्हा जामिया मिलिया प्रकरणाबाबत मला समजलं तेव्हा माझी सहनशक्ति संपली आणि मी पुन्हा ट्विटरवर व्यक्त होऊ लागलो.”
याच मुलाखतीमध्ये अनुरागला ३ वेळा पुनर्वसन केंद्रात जावं लागलं हेदेखील त्याने स्पष्ट केलं, इतकंच नाही तर यादरम्यान त्याला सौम्य हृदयविकाराचा झटकादेखील आला होता. त्यानंतर तो हळूहळू यातून बाहेर आला आणि त्याने स्वतःला कामात अडकवून घेतलं. अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला. आता अनुरागचा आगामी ‘ऑल्मोस्ट लव विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट २०२३ च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज आहे.