चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने बॉलीवूडच्या सद्यस्थितीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. तसेच चांगल्या कलाकृतींच्या निर्मितीसाठी तो मुंबई सोडून दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे जाण्याचा विचार करतोय, असा खुलासा त्याने केला. अनुरागने हिंदी चित्रपटसृष्टीतील नफ्याची मानसिकता, रीमेक बनवणं आणि स्टार मेकिंग संस्कृतीवर टीका केली आहे. यामुळे सर्जनशीलता कमी होते आणि कलाकृतींमध्ये नाविन्य नसतं, असं मत अनुरागने मांडलं.
अनुराग कश्यप हॉलीवूड रिपोर्टरशी बोलताना म्हणाला, “आता बाहेर जाऊन प्रयोग करणं माझ्यासाठी अवघड आहे; कारण त्यासाठी खूप पैसा लागतो. निर्माते नफा आणि मार्जिनचा विचार करतात. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याआधी, तो कसा विकायचा हे ठरतं. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद राहत नाही. म्हणून मला पुढच्या वर्षी मुंबईबाहेर जायचं आहे. मी दक्षिणेत जाणार आहे. मला जिथे काम करावं वाटेल, तिकडे मी जाईन, नाहीतर मी म्हातारा होऊन मरेन. मी या इंडस्ट्रीमुळे खूप निराश झालो आहे आणि वैतागलो आहे. मी या मानसिकतेला वैतागलो आहे.”
अनुराग कश्यपनेच रिमेकच्या मानसिकतेवर केली टीका
‘मंजुम्मेल बॉईज’ सारखे चित्रपट मल्याळम इंडस्ट्रीत बनतात, ते बॉलीवूडमध्ये कधीच बनणार नाही. पण जर एखाद्याने प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला, तर कदाचित तशा चित्रपटांची निर्मिती होईल. “आधीच जे हिट झालंय त्याचेच रिमेक बनवायचे अशी मानसिकता आहे. ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत,” असं अनुराग म्हणाला.
अनुराग कश्यपने टॅलेंट एजन्सींवरही टीका केली. नवीन प्रतिभा शोधण्यापेक्षा नफ्याला प्राधान्य दिलं जातं, असं मत त्याने मांडलं. “एजन्सी असंच करते. ते फक्त तुमच्याकडून पैसे कमवतात. ते नवीन लोकांचे करिअर तयार करण्यासाठी गुंतवणूक करत नाहीत. त्यांना नवीन कलाकारांना इंडस्ट्रीत पुढे जाऊ द्यायचं नाही. ते त्यांना अभिनयाच्या कार्यशाळेत पाठवण्याऐवजी जिममध्ये पाठवतात,” असं अनुराग कश्यप म्हणाला.
हेही वाचा – सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
अनुरागने अशा कलाकारांबद्दल निराशा व्यक्त केली, ज्यांना तो एकेकाळी मित्र मानायचा. “एका अभिनेत्याने, ज्याला मी मित्र मानत होतो, तो आता मला टाळतो, कारण त्याला एका विशिष्ट पद्धतीने पुढे जायचं आहे. अशा गोष्टी इथेच घडतात, मल्याळम इंडस्ट्रीत असं घडत नाही,” असं अनुरागने नमूद केलं.
अनुराग कश्यप नुकताच १९ डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम ॲक्शन थ्रिलर ‘रायफल क्लब’मध्ये झळकला होता.