रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई करून २०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करून सुपरस्टार सलमानच्या सुलतान चित्रपटाचा विक्रम मोडला. हा चित्रपट वर्ल्डवाइड ओपनिंग वीकेंडला आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ चित्रपट ठरला.
परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ची क्रेझ अनुभवयला मिळाली. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ हा बनवायला तब्बल १० वर्षं घेतली. हा चित्रपट करताना बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यावर मात करत अयानने हा चित्रपट सादर केला आणि लोकांनीही तो अक्षरशः डोक्यावर घेतला.
आणखी वाचा : टॉम हँक्सबरोबर चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम साइझमोरचं ६१ व्या वर्षी निधन
आता याच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगताना दिसत आहे. खरंतर पहिल्या भागाच्या शेवटीच याच्या दुसऱ्या भागाची एक झलक आपल्याला बघायला मिळाली होती. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जी म्हणाला की, “ब्रह्मास्त्र २ या चित्रपटावर काम सुरु असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
इतकंच नाही तर ‘ब्रह्मास्त्र २’च्या रिलीजबद्दलही अयान म्हणाला, “पहिल्या भागाप्रमाणेच आम्ही या दुसऱ्या भागासाठीही १० वर्षं घेतली तर आमचा चित्रपट पाहायला कुणीच येणार नाही, त्यामुळेच ‘ब्रह्मास्त्र २’ येत्या २ वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.” अशी खात्रीही अयान मुखर्जीने दिली आहे. यातील दुसऱ्या भागातील ‘देव’च्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा गेल्यावर्षापासूनच सुरू आहे. रणवीर सिंहपासून यशपर्यंत अनेक नावांची चर्चा होत आहे. या भूमिकेत कोण दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अयानने दिलेल्या माहितीनुसार ‘ब्रह्मास्त्र २’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.