अभिनेत्री करीश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ९० च्या दशकातल्या महत्त्वाच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ‘राजा हिंदुस्थानी’ हा सिनेमा करीश्मा कपूरच्या फिल्मी करिअरमधला एक महत्त्वाचा सिनेमा आहे. या सिनेमात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा किसिंग सीन आहे. ज्या सीनवरुन १९९६ मध्ये चांगलीच चर्चा झाली होती. साधारण पाच मिनिटांचं प्रदीर्घ चुंबन दृश्य असलेला हा बहुदा त्या काळातला पहिलाच हिंदी सिनेमा असावा. याच सीनबाबत आता दिग्दर्शक धर्मेश दर्शनने एक महत्त्वाचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
काय म्हटलं आहे धर्मेश दर्शन यांनी?
राजा हिंदुस्थानीमध्ये करिश्मा कपूरने किसिंग सीन दिला. त्याआधी तिने कुठल्याही चित्रपटांमध्ये असा सीन दिला नव्हता. मी तिला तिचे कपडे काय असतील आणि तो सीन कधी येतो त्याची गरज का आहे? हे सगळं समजावून सांगितलं. एका प्रसंगानंतर हा सीन येतो त्यामुळे ती चित्रपटाची गरज आहे हे देखील मी तिला समजावून सांगितलं. करिश्मा तेव्हा लहान होती. त्यामुळे तिची आई तीन दिवस सेटवर होती. करिश्माला तिच्या आईनेही सीन समजावून सांगितला. तसंच हा सीन शूट झाला तेव्हाही त्या सेटवरच होत्या असं दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले धर्मेश दर्शन?
“धर्मेश दर्शन म्हणाले की या सिनेमात असा एक प्रसंग होता ज्यात आमिर खान मद्यधुंद अवस्थेत करिश्मा कपूरचा सगळ्यांसमोर अपमान करतो. त्यात आमिर करिश्माचे केस पकडतो असाही एक प्रसंग होता. मात्र हा सीन करण्याबाबत आमिरच्या मनात थोडा संभ्रम होता. आमिर म्हणाला आपण असा सीन नको करुया त्यापेक्षा मी करिश्माचा हात ओढतो आणि खेचून नेतो. मलाही वाटलं की आमिरचं सांगणं योग्य आहे. मात्र करिश्माला तो सीन वास्तववादी कसा होईल हे पाहायचं होतं. करिश्माने या गोष्टीवर चर्चा केली. त्यानंतर मी आमिरला सगळा सीन समजावला आणि मग तो सीन तसा शूट झाला.” असाही किस्सा धर्मेश दर्शन यांनी सांगितला.
राजा हिंदुस्थानी या सिनेमाच्या पोस्टरवर आमिर आणि करिश्माचा किसिंग सीन ठेवला जावा म्हणजे प्रेक्षकांची गर्दी होईल असाही सल्ला मला देण्यात आला होता मात्र मी त्याला साफ नकार दिला असंही धर्मेश दर्शन यांनी सांगितलं. ‘राजा हिंदुस्थानी’ हा सिनेमा १९९६ मधला सुपरहिट सिनेमा ठरला होता.
‘राजा हिंदुस्थानी’ हा सिनेमा बबीता आणि शशी कपूर यांच्या ‘जब जब फुल खिले’ या सिनेमावर बेतलेला होता. मात्र सिनेमातली गाणी, सिनेमातला आमिर करिश्माचा अभिनय या सगळ्यांच्या जोरावर तो सिनेमा चांगलाच चालला. त्यावेळी किसिंग सीनची चर्चा चांगलीच झाली होती. आता त्यामागचा किस्सा धर्मेश दर्शन यांनी सांगितला आहे.