बॉलीवूडचा किंग खान म्हणून ज्या अभिनेत्याची सर्वदूर ओळख आहे, ज्याचा चाहतावर्ग संपूर्ण जगात पसरलेला आहे, तो अभिनेता म्हणजेच शाहरुख खान होय. १९९२ मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुख खानने आपल्या सहज अभिनयाने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. महत्त्वाचे म्हणजे फक्त प्रेक्षकच शाहरुखचे चाहते आहेत असे नाही तर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शकदेखील किंग खानचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. दिग्दर्शक-निर्माते मुकेश छाबरा हे त्यापैकीच एक आहेत.
नुकत्याच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबरा यांनी कोणत्या गोष्टीमुळे व्यक्ती लोकप्रिय होते किंवा उच्च स्तराला पोहचते यावर आपले मत मांडले आहे. ते म्हणतात- जी व्यक्ती सतत मेहनत करते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कामासाठी समर्पित असते ती व्यक्ती माझ्यासाठी स्टार आहे. तुम्ही किती मोठे होणार आहात आणि किती लोकप्रिय होणार आहात हे कोणीही सांगू शकत नाही. याला अपवाद मात्र एकच आहे, तो म्हणजे शाहरुख खान होय. तो ज्या पद्धतीने मेहनत करतो, त्याच्या जवळ कोणी पोहचू शकत नाही, त्याला कोणी हात लावू शकत नाही. सगळे जण मेहनत करतात, पण अगदी मोजकेच लोक त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करतात आणि तो हे खूप वर्षांपासून करत आला आहे. शाहरुख आजही अभिनयाच्या प्रेमात आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन खूप लोक मुंबईमध्ये काम करण्यासाठी येतात, त्याचा अनेकांवर प्रभाव आहे.
हेही वाचा: Video: विकी कौशलसारखा डान्स करताना पृथ्वीक प्रतापच्या आईनं केलं असं काही…; नेटकरी करतायत कौतुक
ते पुढे म्हणतात, “ज्यांनी शाहरुखबरोबर काम केलेलं आहे त्यांना माहीत आहे की, तुम्ही त्याला ज्या ज्या वेळी भेटता, त्या त्या वेळी तो तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. सहसा तुम्ही ज्यावेळी एखाद्या कलाकाराबरोबर काम करण्यास सुरुवात करता तेव्हा तुमच्यामध्ये गोष्टी सामान्य होतात, पण शाहरुखसोबत असे घडत नाही. तुम्ही जितके जास्त त्याच्याबरोबर काम करता, त्याला भेटता तितके तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. महत्त्वाचे म्हणजे हे अखंडित वाढत जाते. त्याला भेटल्यावर जेव्हा तुम्ही घरी जाता, तेव्हा तुम्ही शाहरुखचा विचार करत असता असे मुकेश छाब्रा यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की, फक्त तुम्ही शाहरुखवर प्रेम करता असं होत नाही, तो देखील तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही त्याच्यावर परत आणखी प्रेम करू लागता”, असे मुकेश छाबरा यांनी म्हटले आहे.
मुकेश छाबरा यांनी ‘चक दे इंडिया’, ‘झिरो’ , ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांमध्ये शाहरुखसोबत काम केले आहे. याबरोबरच शाहरुखचा गाजलेला ‘जवान’ या चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर असण्यासोबतच त्यांनी अभिनयदेखील केला आहे. याबद्दल बोलताना ते म्हणतात की, शाहरुख खान समोर उभे राहण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि तो जर तुमच्या डोळ्यात बघत असेल तर तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजू शकता. शाहरुखमुळे मी चित्रपटात अभिनय करण्यास नकार देऊ शकलो नाही, असे मुकेश छाबरा यांनी म्हटले आहे.