दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं चित्रपट रसिकांच्या मनातील स्थान अढळ आहे. आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची उणीव जाणवते. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. बॉलिवूडची ‘हवाहवाई’ म्हणून कित्येकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मोठ्या पडद्यावर श्रीदेवी यांचं पुनरागमन याच चित्रपटातून झालं होतं. हा चित्रपट आणि त्यातील त्यांचं शशी हे पात्र प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.
या चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने या चित्रपटाची १० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त एक खुशखबर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना दिली आहे. या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेसलेल्या आयकॉनीक साडीचा लिलाव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गौरी शिंदे हिने दिली आहे. ५ ऑक्टोबर २०१२ या दिवशी ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. परदेशात गेल्यावर इंग्रजी भाषेची होणारी अडचण आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या गृहिणीचा प्रवास यातून मांडण्यात आला होता.
आणखी वाचा : पतौडी घराण्यातील धाकटी मुलगी एकेकाळी बँकेत करायची काम; सध्या आहे चित्रपटसृष्टीपासून दूर
इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने याबाबतीत मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेसलेल्या सगळ्या साड्या गौरीने जपून ठेवल्या आहेत. आता त्यातील एका साडीचा लिलाव करण्यात येणार असल्याचं गौरीने स्पष्ट केलं आहे. ती म्हणते, “‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाला १० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही येत्या १० ऑक्टोबरला या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं आहे. शिवाय या चित्रपटात श्रीदेवी यांनी नसलेल्या साडीचा आम्ही लिलाव करणार आहोत. त्यातून येणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी एका सेवाभावी संस्थेला देण्याचा मी निर्णय घेतला आहे.”
गौरीच्या या चित्रपटामधून श्रीदेवी यांनी १५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पुली’ या तामीळ चित्रपटात आणि ‘मॉम’ या हिंदी चित्रपटात श्रीदेवी यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. शाहरुख खानच्या ‘झीरो’ या चित्रपटात श्रीदेवी या पाहुण्या कलाकार म्हणून दिसल्या होत्या. २०१८ साली फेब्रुवारी महिन्यात श्रीदेवी यांचं निधन झालं.