‘जवान’ आणि ‘पठाण’सारख्या मसाला चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या शाहरुख खानची गेली ४ वर्षं बरीच खडतर होती. त्याआधीदेखील शाहरुखने फार वेगळे चित्रपट करायचा प्रयत्न केला. त्याच काही चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे गौर शिंदेचा ‘डियर जिंदगी’. या चित्रपटात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत होती अन् शाहरुख खानची सहाय्यक भूमिका होती, परंतु आपल्या छोट्याशा भूमिकेतूनही शाहरुखने प्रेक्षकांवर चांगलाच प्रभास टाकला.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान गौरी शिंदेने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. ही भूमिका ऐकताच शाहरुखने लगेच यासाठी होकार दिल्याचंही गौरीने स्पष्ट केलं. फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरीने शाहरुख खान हा जहांगीरसारखाच असल्याचा खुलासाही केला. ‘डियर जिंदगी’मध्ये थेरपिस्टची भूमिका शाहरुखने निभावली होती.
त्याबद्दल गौरी म्हणाली, “ही व्यक्तिरेखा अगदी शाहरुखसारखीच आहे, शाहरुख खऱ्या आयुष्यातही असाच आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. जहांगीर खान हे पात्र साकारण्यासाठी माझ्यासमोर दूसरा कोणताही पर्याय नव्हता. शाहरुखने साकारलेल्या त्या भूमिकेमुळे आज थोडीफार लोक थेरपी ही गोष्ट मनावर घेऊ लागली आहेत. मला मुख्य प्रवाहातील एक अभिनेता आणि एक स्टार हवा होता. तो कितीही ग्रेट अभिनेता असला तरी जेव्हा तो बोलायला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला त्याला फक्त ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे.”
२०१६ साली आलेल्या ‘डियर जिंदगी’ची निर्मिती शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ने केली होती. या चित्रपटात आलिया भट्टसह कुणाल कपूर, अली जफर, अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली होती. शाहरुखची छोटीशी भूमिका असूनसुद्धा त्याने चित्रपटावर चांगलाच चांगली मदतच झाली.