बॉलिवूडमध्ये सतत काहीतरी वेगळे आणि हटके विषय असलेले चित्रपट देणारा दिग्दर्शक इम्तियाज अलीने आज या इंडस्ट्रीत स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे. ‘लव्ह आज कल’, ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’, ‘तमाशा’सारख्या चित्रपटातून इम्तियाज हा एक फिल्ममेकर म्हणून समोर आला, परंतु आपल्या करिअरची सुरुवात त्याने अभिनयातून केली होती.
अनुराग कश्यपच्या प्रदर्शित होऊ न शकलेल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटात इम्तियाजने याकुब मेमनची भूमिका निभावली होती. अगदी काही मोजकेच सीन्स आपल्याला चित्रपटात दिसले, परंतु या चित्रपटात काम करण्यामागचं नेमकं कारण इम्तियाजने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आणखी वाचा : ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्यावर करीना कपूरला ‘असा’ सामोरा गेलेला आमिर खान; बेबो म्हणाली…
नुकतंच इम्तियाज अलीने ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यादरम्यान त्याने ‘ब्लॅक फ्रायडे’ चित्रपटात काम करणं ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असा खुलासा केला. इम्तियाज म्हणाला, “आपण जेव्हा तरुण असतो अन् आपण तेव्हा बऱ्याच चुका करतो, त्यापैकीच माझी एक चूक होती अनुराग कश्यपचा सल्ला मनावर घेणं. त्यावेळी आम्ही एकत्रच एका बिल्डिंगमध्ये राहायचो अन् यामुळेच आम्ही एकमेकांच्या कामात दखल द्यायचो. मी याकुब मेमनची भूमिका करावी हे त्याने मला का सुचवलं याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही.”
पुढे इम्तियाज म्हणाला, “अनुराग माझी खिल्ली उडवत होता. तो मस्करीमध्ये म्हणायचा की मी तुझ्यासाठी माझा जीव देऊ शकतो, तर तू माझ्यासाठी एक भूमिका करू शकत नाहीस. असं अत्यंत उत्तम अभिनय करून त्याने माझ्याकडून काम करवून घेतलं. त्यावेळी अनुराग स्वतःसुद्धा अभिनयामध्ये नशीब आजमावत होता.” इम्तियाज अली आता लवकरच पंजाबचा लोकप्रिय गायक अमर सिंह चमकीला यांचा बायोपिक घेऊन येत आहे. दलजित दोसांझ यात मुख्य भूमिकेत दिसणार असून ए.आर.रेहमानने या चित्रपटाला संगीत दिलं आहे.