बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)ने आजपर्यंत अनेक उत्तम चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या काळात आमिर खानला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला होता. १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘कयामत से कयामत तक’ हा त्याचा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. आमिर खानने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर त्याचे आठ चित्रपट सलग फ्लॉप ठरले. ‘दिल’ या चित्रपटातून आमिर खानने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता ‘दिल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी एका मुलाखतीत, १९९० साली प्रदर्शित झालेला ‘दिल’ हा चित्रपट त्यांच्या व आमिर खानच्या कारकि‍र्दीसाठी किती महत्त्वाचा होता हे सांगितले आहे. इंद्र कुमार यांचा दिग्दर्शक म्हणून ‘दिल’ हा पहिलाच चित्रपट होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाचे यश हे कलाकाराच्या नाही तर दिग्दर्शकाच्या हातात…

इंद्र कुमार यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खानविषयी बोलताना त्यांनी म्हटले, “आमिर खानचे ‘कयामत से कयामत तक’नंतर सलग आठ चित्रपट फ्लॉप ठरले. पण, तो काय करू शकत होता. तो प्रामाणिकपणे काम करत होता. चित्रपटाचे यश हे कलाकाराच्या नाही तर दिग्दर्शकाच्या हातात असते. जर ‘दिल’ हा चित्रपट हिट झाला नसता, लोकांना आवडला नसता तर आमिर व माझे दोघांचे करिअर संपले असते. आमिर खूप हुशार होता, त्याला फक्त चांगल्या संधीची गरज होती. ‘दिल’ चित्रपटापासून त्याच्या करिअरने जी उंची गाठली, तेव्हापासून त्याने मागे फिरून बघितले नाही.”

दिग्दर्शक इंद्र कुमार व आमिर खान यांनी ‘इश्क’ व ‘मन’ या आणखी दोन चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘मन’ या चित्रपटात अनिल कपूर व मनीषा कोईराला हे कलाकारदेखील होते. ‘मन’बाबत बोलताना इंद्र कुमार यांनी म्हटले की, हा चित्रपट करताना काहीतरी चुकत असल्याची भावना होती. काहीतरी गडबड आहे, असे वाटत होते. चित्रपट तयार होत असताना एक वेळ अशी होती, जेव्हा आमिर खाननेदेखील त्याच्या या चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. सेटवर आमिर खानने म्हटले होते की, हा चित्रपट कुठेतरी दुसरीकडेच जाताना दिसत आहे. त्याला त्या चित्रपटाबद्दल अविश्वास वाटत होता. त्याला मी सांगितले की, याबद्दल चर्चा केली आहे, आपल्याला विश्वास ठेवावा लागेल.

‘मन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. रीना दत्त यांच्याबरोबर झालेल्या घटस्फोटामुळे आमिर खान ‘मन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विचलित झाला होता का, असे इंद्र कुमार यांना विचारले. यावर बोलताना हे खोटे असून आमिर अत्यंत प्रोफेशनल असल्याचे त्यांनी म्हटले. इंद्र कुमारने आमिर खानबद्दल बोलताना म्हटले, “जेव्हा आमिर खान काम कऱण्यासाठी येतो, त्यावेळी तो इतर कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवत नाही. ‘मन’ चित्रपटातील त्याचा अभिनय हा त्याच्या अनेक उत्तम कामांपैकी एक आहे. जर या चित्रपटात कोणी अपयशी ठरले असेल तर तो मी आहे, आमिर नाही”, असे म्हणत इंद्र कुमार यांनी आमिर खानच्या कामाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: “…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”

दरम्यान, ‘मन’ चित्रपटानंतर आमिर खान व इंद्र कुमार यांनी एकत्र काम केले नाही. आता आमिर खान लवकरच त्याच्या बहुप्रतिक्षित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director indra kumar reveals aamir khan had eight flops in a row after qayamat se qayamat tak says if dil hadnt worked both of us wouldnt have had careers nsp