४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. ‘पठाण’ने आमिरच्या ‘दंगल’चा रेकॉर्ड मोडला असून या चित्रपटाने जगभरात ९३० कोटीच्या आसपास कमाई केली आहे. अशातच युट्यूबवरही शाहरुखचीच हवा आहे. नुकताच शाहरुखचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच फिरवला जात आहे.
गेल्यावर्षी ऑस्करला पाठवलेल्या ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक पॅन नालिन यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. शाहरुख आणि सलमानच्या ‘करण अर्जुन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी स्वतः हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या सेटवरील धमाल बघायला मिळत आहे. शिवाय शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ एक खास भेटच आहे.
आणखी वाचा : ‘बाहुबली’मधील ‘भल्लालदेव’ अडचणीत; अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर लागलेत जमीन बळकावण्याचे आरोप
या व्हिडीओमध्ये शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे, शिवाय त्या सीन्ससाठी घेतलेली मेहनतही आपल्याला दिसत आहे. याबरोबरच शाहरुख त्याची पत्नी गौरीला वर्कआऊट शिकवत आहे. गाडीतून बाहेर फिरायला गेल्यावर शाहरुख भेटणाऱ्या लोकांना हस्तांदोलन करत आहे. रस्त्यावरील एका गरीब मुलीशी शाहरुख गप्पा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शाहरुखच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
या व्हिडीओला २४ तासात ७ लाखांहून अधिक लोकांनी पहिलं असून तब्बल १०००० लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. शिवाय व्हिडीओखाली शाहरुखचे चाहते कॉमेंटचा वर्षाव करत आहेत. शाहरुखने त्याच्या पुढचा चित्रपट ‘जवान’वर काम सुरू केलं आहे, शिवाय तो राजकुमार हिरानी यांच्याबरोबर ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी शाहरुखचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.