Pankaj Parashar : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या जगात नसल्या तरी त्यांचे अनेक चित्रपट चाहते आजही आवडीने पाहतात. श्रीदेवी यांच्या अभिनयाची जादू आणि नृत्य यांमुळे त्यांनी मोठा चाहता वर्ग कमावला होता. त्या काळी प्रत्येक कलाकाराला श्रीदेवी यांच्याबरोबर अभिनय करता यावा, असं वाटायचं. बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारला ही संधी मिळाली होती. त्याने ‘मेरी बीवी का जवाब नही’ या चित्रपटात श्रीदेवी यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा दिग्दर्शक पंकज पराशर यांनी सांगितला आहे. त्यांनी सांगितलेला हा किस्सा आता चर्चेत आलाय.
पंकज पराशर यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मेरी बीवी का जवाब नही’ या चित्रपटातील काही आठवणी सांगितल्या आहेत. अक्षय कुमारचा स्वभाव, त्याची अभिनयाची शैली यांसह श्रीदेवी त्याच्यावर नाराज झाल्या होत्या. तसेच अक्षय श्रीदेवी यांच्याबरोबर काम करताना सुरुवातीला घाबरत होता. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. तसेत यात त्यांनी चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगचा किस्साही सांगितला आहे.
हेही वाचा : लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पंकज पराशर म्हणाले, “अक्षय कुमार एक सरळ आणि चांगली व्यक्ती आहे. तो रोज सकाळी बरोबर ५ वाजता उठायचा. त्यानंतर तो मलासुद्धा उठवायचा आणि डोंगराळ भागात फिरायला घेऊन जायचा. तो माझ्याकडून तेथे योगा करून घ्यायचा. तो माझ्याशी अगदी प्रेमाणे वागायचा त्यामुळे मलाही त्याच्याबरोबर काम करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळत होते.”
पुढे चित्रपटातील किस्सा सांगताना ते म्हणाले, “अक्षय त्यावेळी एक नवखा अभिनेता होता. त्यामुळे श्रीदेवी यांच्यासारख्या हरहुन्नरी अभिनेत्रीबरोबर काम करताना तो घाबरायचा. एका सीनच्या शूटिंगवेळी त्याने तब्बल ३६ टेक घेतले होते. त्यावेळी श्रीदेवी त्याच्यावर थोड्या चिडल्या होत्या. त्या माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, “त्याचा आणखी सराव करून घ्या यार, आधीच त्याचा ३६ वा टेक सूरू आहे.”
पुढे सिद्धार्थ यांनी सांगितलं, “तो एक न्यायालयातील सीन होता. त्यामुळे मला तो मध्येच कट करून घ्यायचा नव्हता. मला हा सीन पूर्ण हवा होता. मी मध्येच सीन कट करून घेतला असता, तर अक्षयचा आत्मविश्वास कमी झाला असता. सीन फार मोठा असल्याने अक्षयला तो व्यवस्थित जमत नव्हता. मात्र, मी सांगितलं होतं जोपर्यंत परफेक्ट सीन येत नाही तोपर्यंत करत राहा. त्यावेळी श्रीदेवी तेथेच बसून अक्षयचा अभिनय पाहत होत्या. शेवटी अक्षयने तो सीन पूर्ण केला आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.”
हेही वाचा : ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
दिग्दर्शक पंकज पराशर म्हणाले, “श्रीदेवींना अक्षयचा अभिनय आवडला होता. तसेच त्यांनी लगेचच अक्षयची मेहनत ओळखली होती.” श्रीदेवी आणि अक्षयचा हा चित्रपट त्या काळी गाजला नाही आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. “मात्र, या चित्रपटात अक्षयने श्रीदेवी यांच्याबरोबर काम केल्याने त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती”, असे पंकज यांनी पुढे सांगितले.