१२ ऑक्टोबर २०१८ साली भारतीय चित्रपटसृष्टीचे मापदंड मोडीत काढणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, आणि केवळ माउथ पब्लिसिटीच्या आधाराने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आज या चित्रपटाला पाच वर्षं पूर्ण होत आहेत. सुरुवातीला या चित्रपटाकडे कुणी गांभीर्याने बघत नव्हतं, पण हा चित्रपट बघून जसजसे लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तसा हा चित्रपट मोठा होत गेला.
दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा हा चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली. याचसंदर्भात राही अनिल बर्वे यांनी एका मुलाखतीमध्ये ‘तुंबाड’ हा चित्रपट मराठीत का केला नाही यावर भाष्य केलं होतं.
२०१९ मध्ये ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राही अनिल बर्वे यांनी ‘तुंबाड’ मराठीत का बनवला नव्हता याचं उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, “मला खरंतर संताप येतो या अशा प्रश्नांचा, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की त्यांनी तुंबाड पहा, किंवा माझी आधीची शॉर्टफिल्म मांजा पहा, मी अर्थात तुंबाड मराठीमध्ये करणं शक्यच नव्हतं. आत्ता कुठे मराठी चित्रपटसृष्टी श्वास घेऊ लागली आहे. अविनाश अरुण, नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणे यासारखे दिग्दर्शक आत्ता पुढे येऊ लागलेत.”
पुढे राही बर्वे म्हणाले, “मराठीमधील सर्वात बिग बजेट फिल्म आहे त्याहूनही चौपट जास्त बजेट तुंबाडचं आहे त्यामुळे ते मराठीत करणं शक्यच नव्हतं. आणि जरी कोण्या मराठी निर्मात्याने धाडस करून चित्रपट घेतला असता तरी त्यातून त्याला नफा किती झाला असता, आज मराठी चित्रपटांना थेटर्स मिळत नाहीयेत. मी गुजराती असतो तरी तुंबाड गुजरातीमध्ये बनवणं मला शक्य झालं नसतं. दाक्षिणात्य राज्यातील भाषेत कदाचित तो शक्य झाला असता कारण तिथलं गणित फार वेगळं आहे. आणि तुंबाडचा भाषेशी संदर्भ नाही, ही एक वैश्विक कथा आहे.”
आणखी वाचा : Photos : केवळ ५ कोटींचे बजेट असलेला ‘तुंबाड’ कसा घडला?
भारतीय चित्रपटाच्या इतिहासात काहीतरी वेगळी कलाकृती सादर करून ती यशस्वी करून दाखवणाऱ्या ‘तुंबाड’च्या पुढील भागाची आजही प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्या वाड्याचे दार पुन्हा उघडेल अशी लोकांना आशा आहे. सध्या मात्र राही हे त्यांच्या ‘गुलकंद’ या वेबसीरिजवर काम करत आहेत.