सध्याच्या तरुणाईची अचूक नस ओलखणारे राज निदिमोरू आणि कृष्णा डीके म्हणजेच राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडगोळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. हटके विषय आणि त्यांची आणखी हटके हाताळणी यासाठी हे दोघेही दिग्दर्शक लोकप्रिय आहेत. २०१३ साली आलेल्या ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटामुळे राज आणि डीके यांना ओळख मिळाली. त्यांच्या या हटके चित्रपटाची संपूर्ण चित्रपटसृष्टीने दखल घेतली.
भारताला पहिला झॉम्बीपट याच दिग्दर्शक जोडगोळीने दिला. त्यांच्या या चित्रपटादरम्यानच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या आहेत. ‘गो गोवा गॉन’ करताना त्यांना आलेला अनुभव आणि सैफ अली खानची पहिली प्रतिक्रिया याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. शिवाय २०१० साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटानंतर ते झॉम्बीवर चित्रपट काढत आहोत हे बऱ्याच लोकांच्या पचनी पडत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आणखी वाचा : कन्नड चित्रपट ‘कब्जा’ बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; सुपरस्टार किच्चा सुदीप असूनही कमावले ‘इतके’ कोटी
बॉलिवूड हंगमाशी संवाद साधताना राज आणि डीके यांनी ‘गो गोवा गॉन’ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर सैफ अली खानच्या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला आहे. याबद्दल राज म्हणाला, “आम्हाला शोर इन द सिटीसाठी पुरस्कार मिळत होते, आणि तेव्हा आम्ही झॉम्बीवर काम करत असलेल्या चित्रपटासाठी लोकांना विचारत होतो.” सैफने तर चक्क एक जळजळीत शिवी घालत या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवल्याचं त्यांनी सांगितलं. सैफ म्हणाला, “हा चु*** आहे, पण मी यात काम करण्यास उत्सुक आहे.”
सुरुवातीला इंडस्ट्रीतील लोकांनी आम्हाला गांभीर्याने घेतलं नाही असंदेखील राज आणि डीके यांनी म्हंटलं आहे. ‘गो गोवा गॉन’च्या वेळी बऱ्याच लोकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं, पण हा भारतातील पहिलाच झॉम्बीपटाचा प्रयोग यशस्वी झाला आणि राज आणि डीके यांच्याकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला. राज आणि डीके यांनी प्राइम व्हिडिओवरील ‘द फॅमिलीमॅन’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ या वेबसीरिजचं दिग्दर्शनही केलं आहे.