बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची घोषणा झाली असून आता या चित्रपटाची झलक समोर आली असून यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर दिसत आहे. चित्रपटातील आणखीन एका पात्राचा लूक समोर आला आहे.
‘घायल’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’ सारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिग्दर्शित करणारे राजकुमार संतोषी यांची लेक, तनिषादेखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटातला पहिला लूक तिने शेअर केला आहे. यात ती ग्लॅमर्स अवतारात साध्या लूकमध्ये दिसत आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा लूक शेअर केला आहे.
तनिषा सोशल मीडियावर सक्रीय असते. २९ हजार इतके तिचे फॉलोवर्स आहेत. “मी खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत आहे आणि तो क्षण एकदाचा आला. एका दूरदर्शी चित्रपट निर्मात्याने बनवलेल्या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. माझ्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक शेअर करताना खूप भावूक वाटत आहे. मला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे.” अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
या चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.