अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी अनेक चित्रपट एकत्र करत यशाला गवसणी घातली आहे. त्यांची जोडी प्रसिद्ध होत असतानाच सुभाष घई यांनी शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha ) यांच्याबरोबर काम न कऱण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, सुभाष घई यांनी असा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे.
काय म्हणाले सुभाष घई?
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत, सुभाष घई यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरचा काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे, “शत्रुघ्न सिन्हा अतिआत्मविश्वासू होता. जेव्हा मी ‘कालीचरण’ चित्रपटाची कथा शत्रुघ्न सिन्हाला सांगत होतो, त्यावेळी त्याने मला म्हटले की, मी आधीच चार चित्रपटांत पोलिसाची भूमिका निभावत आहे. या चित्रपटातील ही भूमिका स्वीकारण्यासाठी यामध्ये वेगळे असे काही नाही. हा चित्रपट मी कशासाठी करू? त्यावेळी मला समजले की, तो काय म्हणत आहे. कलाकाराला गोष्ट किती समजली हे आपण समजून घेणे महत्त्वाचे असते. कलाकार आपण सांगत असलेल्या गोष्टीवर २५-३० टक्के लक्ष देतो. जर तुम्ही यशस्वी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक असाल आणि काहीही म्हणत असाल तरीदेखील कलाकार आधीच तुमच्या चित्रपटात काम कऱण्यासाठी तयार असतो.
सुभाष घई यांनी म्हटल्यानुसार, ते आणि शत्रुघ्न सिन्हा हे एफटीआयआयपासूनचे मित्र होते आणि ते अनेकदा एकत्र वेळ घालवत असत. ‘कालीचरण’ चित्रपटाची आठवण सांगताना त्यांनी म्हटले आहे, एन. एन. सिप्पी हे या चित्रपटासाठी निर्माते म्हणून मिळाले होते आणि मी त्यांना सांगितले की, शत्रुघ्नने आधीच चित्रपट नाकारला आहे. मात्र, काही दिवसांनंतर जेव्हा सिप्पी सर शत्रुघ्न सिन्हाला भेटले, त्यावेळी त्याने मला जे बोलताना म्हटले होते, त्याच्याबरोबर विरुद्ध त्यांच्याशी बोलताना म्हटले. तो त्यांना चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला, ‘कालीचरण’? मी त्याच्याबद्दल ऐकले आहे. हा चित्रपट खूप गाजणार, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
पुढे बोलताना ते म्हणतात की, शत्रुघ्न सिन्हाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो कधीच वेळेत यायचा नाही. ९ ची शिफ्ट असली की तो १ वाजता यायचा. १ च्या शिफ्टला ४ ला यायचा. ही खूप मोठी समस्या होती. मी एकदा त्याला म्हटले होते, “शत्रुघ्न, आपण मित्र आहोत, आपण काही चित्रपटदेखील एकत्र केले आहेत. पण, तुझा असा स्वभाव पुढे काम करताना मला चालणार नाही.” नंतर आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा आणि सुभाष घई यांनी १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘विश्वनाथ’ या चित्रपटात शेवटचे एकत्र काम केले आहे.