सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. काही राज्यांमध्ये बंदी असूनही हा चित्रपट कमालीची चांगली कामगिरी करीत आहे. हा चित्रपट लवकरच जागतिक स्तरावरही प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी मोठा खुलासा केला आहे. टीझर रिलीज झाल्यापासून एक मुलगा त्याला सतत असभ्य भाषेत मेसेज पाठवीत असल्याचे सेन म्हणाले.
हेही वाचा- “ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा वाटतो ते…,” ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी मांडले परखड मत
‘द केरला स्टोरी’ने पहिल्या वीकेंडमध्ये ३३.३५ कोटींची कमाई केली होती. तर, रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने सोमवारी १०.५० कोटींची कमाई केली. विरोध आणि बंदी असतानाही, प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत असलेले प्रेम पाहता चित्रपट लवकरच ५० कोटींचा टप्पा पार करेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या बातमीनुसार, सुदीप्तो सेन म्हणाले की, ‘द केरला स्टोरी’चा टीझर रिलीज झाल्यापासून त्याला आणि त्याच्या टीमला एका मुलाकडून शिवराळ भाषेत मेसेज पाठवले जात होते. गेल्या दोन महिन्यांपासून तो चित्रपटाच्या सहनिर्मात्याला शिवीगाळ करीत होता. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर त्या मुलाने मेसेजद्वारे माफी मागितली असल्याचेही सेन यांनी सांगितले.
सेन पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की असे लोक चित्रपटाच्या विरोधात उभे होते, मात्र आज चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमचा विरोध करणे बंद केले आहे. आज ज्या लोकांनी चित्रपट बघितला नाही तेच लोक विरोध करीत असल्याचेही सेन म्हणाले.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी ( ८ मे ) ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर राज्यात बंदी घातली आहे. बंगालमधील सर्व थिएटर्समधील स्क्रीनवरून हा चित्रपट काढून टाकण्याचे आदेश मुख्य सचिवांना ममता बॅनर्जींनी दिले आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशपाठोपाठ उत्तर प्रदेशातही ‘द केरला स्टोरी’ चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे.