अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हे आपापल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. करिश्मा गेले काही वर्ष मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. पण अभिषेक आणि करिश्मा दोघं २००० साली चांगलेच चर्चेत आले. या दोघांचं लग्न ठरलं होतं पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही. आता या मागचं कारण समोर आलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली, त्यात त्यांनी अभिषेक-करिश्माचं लग्न मोडण्यामगचं कारण उघड केलं आहे.
२००२ मध्ये आलेल्या ‘हा मैंने भी प्यार किया है’ या चित्रपटामध्ये अभिषेक आणि करिश्मा यांनी एकत्र स्क्रीन शेअर केला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. तर या चित्रपटाची निर्मिती सुनील दर्शन यांनी केली होती. पण त्यादरम्यान करिश्मा आणि अभिषेक यांची जोडी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली होती. या दोघांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांच्यातली जवळीक एवढी वाढली की त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. मात्र त्यांचं लग्न होणं शक्य नव्हतं असं सुनील दर्शन यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा : “घर गहाण ठेवलं, जमिनीवर झोपण्याची वेळ…” जॅकी श्रॉफ यांची पत्नी भावूक
सुनील दर्शन यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की, “अभिषेक आणि करिश्मा लग्न करणार ही काही अफवा नव्हती. ती खरीच गोष्ट होती. मात्र ते लग्न काही होऊ शकलं नाही. काही कारणाने त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि तो वाढत गेला. त्याचा परिणाम लग्न करण्याच्या निर्णयावर झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. बाबीता जींमुळे करीना आणि करिश्मा या माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या.”
हेही वाचा : “तेव्हा शाहरुखने मला…”; अभिषेक बच्चनने जागवल्या स्ट्रगलच्या काळातल्या आठवणी
पुढे ते म्हणाले, “मला वाटतं ते दोघं एकमेकांना अनुरूप नव्हते. अभिषेक हा खूप चांगला मुलगा आहे. तसंच करिश्माही स्वभावाने खूप गोड आहे. पण त्यांच्या नात्याचं लग्नात रूपांतर न होणं हे त्यांच्या नशिबात नव्हतं.” लग्न मोडल्यानंतर यानंतर अभिषेक आणि करिश्मा यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.