अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अमिताभ बच्चन वडिलाच्या भूमिकेत आहेत, तर रश्मिका मंदानाने त्यांच्या मुलीची भूमिका साकारतेय. या चित्रपटातून रश्मिकाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष गेलेच, मात्र ‘गुडबाय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटामुळे रश्मिका नव्हे तर दुसरीच अभिनेत्री चर्चेत आहे. ती अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन.
आणखी वाचा : “आम्हाला प्रेक्षकांनी हे जग…”, करण जोहरने ‘ब्रह्मास्त्र’बाबत केला मोठा खुलासा
चित्रपटाच्या सुरुवातीला दिग्दर्शक विकास बहल यांनी अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्या नावाचा उल्लेख करत तिचे ‘विशेष आभार’ मानले. क्रितीचे नाव पाहिल्यानतंर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे क्रितीचं आणि या चित्रपटाचं काय कनेक्शन असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिग्दर्शक विकास बहल यांनी दिलं आहे.
चित्रपटाच्या नावामध्ये क्रितीचं योगदान आहे. क्रितीला विकास बहल हा चित्रपट बनवत असल्याचे कळल्यावर तिने याबाबत बहल यांना फोन करून विचारणा केली आणि गप्पा मारताना तिनं या चित्रपटाच शीर्षक त्यांना सुचवलं. विशेष म्हणजे बहल यांच्या बहूतांश चित्रपटाचे नाव हे इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे त्यांना ‘गुडबाय’ हे इंग्रजी नाव फार आवडले आणि हे चित्रपटाच्या कथेला समर्पक आहे हे त्यांना जाणवले. त्यांनी काही जाणकार व्यक्तींशी याबाबत चर्चा केली आणि चित्रपटाचं हे ‘गुडबाय’ असेल असं अगदी पाच मिनिटांत निश्चित केलं. त्यामुळे चित्रपटाचं शीर्षक म्हणजेच ‘गुडबाय’मध्ये क्रितीचं योगदान आहे म्हणून विकास बहल यांनी क्रितीचे विशेष आभार मानले आहेत.
हेही वाचा : हिंदुस्तानी भाऊचे ‘गुडबाय’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नीना गुप्ता आणि पवैल गुलाटी असे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सुनील ग्रोव्हर, एली अवराम, साहिल मेहता, अभिषेक खान यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विकास बहल यांनी ‘गुडबाय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.