बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अलीकडेच ते ‘अनस्क्रिप्टेड’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विवेक अग्निहोत्रींनी बॉलीवूड सेलिब्रिटींना मूर्ख म्हणत त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. तसंच अशा लोकांबरोबर काम करणं शक्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विवेक अग्निहोत्री बॉलीवूडबाबत नेमकं काय म्हणाले पाहूयात…
विवेक अग्निहोत्री पॉडकास्टमध्ये म्हणाले, “मी आजवर ज्या कलाकारांबरोबर काम केलंय ते अजिबात शिकलेले नव्हते. माझ्या शिक्षणाचा मला अहंकार नसून बॉलीवूडची सत्यपरिस्थिती मी तुम्हाला सांगत आहे. या मूर्ख कलाकारांबरोबर काम करून तुम्ही सुद्धा खाली खेचले जाता. त्यांना जगातील इतर गोष्टींचं अजिबात ज्ञान नाही. त्यांच्यापेक्षा मी जास्त हुशार आहे.”
“भारतीय सिनेमा या बॉलीवूड कलाकारांमुळे पुढे जात नाही. हे मूर्ख कलाकार लेखक आणि दिग्दर्शकाला सहज वेडं ठरवतात. त्यांना वाटतं चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षकवर्ग सुद्धा मूर्ख आहेत. चित्रपट लेखक-दिग्दर्शकामुळे नव्हे तर मूर्ख कलाकारांच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे मी या बॉलीवूडमधून मानसिक निवृत्ती घेतली आहे. आता हळूहळू प्रेक्षकांना चांगल्या चित्रपटांचं मूल्य कळू लागलं आहे. आता एकाच प्रकारचे चित्रपट प्रेक्षक पाहणार नाहीत, ते हुशार झाले आहेत. ” असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
हेही वाचा : काजोलचा राजेशाही थाट! मुंबईत ऑफिससाठी खरेदी केली नवीन जागा, किंमत वाचून व्हाल थक्क
दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. नुकताच या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. सध्या विवेक अग्निहोत्री ‘द दिल्ली फाइल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. याशिवाय २८ सप्टेंबरला त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.