Disha Patani Sister Khushboo on Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. माजी लष्करी अधिकारी व बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पटानी यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. एकेकाळी भारतीय सैन्यात सेवा बजावणाऱ्या खुशबू म्हणतात की आता युद्ध व्हायला हवं, कारण या सगळ्यामागे पाकिस्तानी सैन्य आहे.

खुशबू पाटनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही व्हिडीओ शेअर केले आहेत. “मी तुम्हाला सांगतेय की, हे दहशतवादी नाहीत. मी काश्मीरमध्ये २ वर्ष राहिले आहे. मी दोन वर्षे सैन्यात सेवा केली आहे. मी पहलगाममध्ये होते. मी काश्मीरमधील अनेक ठिकाणं पाहिली आहेत. मी काश्मीरमधील अनेक जागा बारकाईने पाहिल्या आहेत. खासकरून पहलगाम हे मिनी स्वित्झर्लंड आहे. मी तेही पाहिलंय. इथे खूप मोठे मैदान आहेत. हे जे काही त्यांनी केलंय, मला खात्री आहे की आपले पंतप्रधान… बदला तर घेतलाच पाहिजे,” असं खुशबू म्हणाल्या.

‘एअरस्ट्राइक केव्हापर्यंत करणार?’

खुशबू पुढे म्हणाल्या, “मला वाटतं की आपण किती काळ एअरस्ट्राइक करत राहणार आहोत. नंतर आणखी एक उरी होईल. मला वाटते की आता एक युद्ध झालं पाहिजे. जसे इतर देश त्यांच्या देशाचे रक्षण करतात. जसे इस्रायलने केले, रशिया युक्रेनवर करतंय, त्याप्रमाणे भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध करायला पाहिजे. भाऊ-भाऊ करण्यात अर्थ नाही. आपण भारतीय खूप मृदू आहोत, आपण सहसा युद्धाचा विचार करत नाही. बाकीचे देश युद्ध करतात, बॉम्ब टाकतात. आपण वाट पाहतो आणि विचार करतो, वाटाघाटी करतो. कारण आपण महाभारत मानतो. कृष्णाने युद्ध होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण जर या कौरवांना ते करायचंच असेल तर महाभारत व्हायलाच पाहिजे आणि त्या सर्वांना नष्ट केलं पाहिजे. या गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशविरोधी व्यक्तीलाही संपवायला पाहिजे. तुम्ही स्वतः पहा, काश्मीरमध्ये विकास कसा होत होता, पहलगाममधील स्थानिक लोकांसाठी आता सगळं संपलंय. आता कोण पर्यटक जाणार? किती भीती आहे? मरण्याची भीती आहे, आता कोण येणार? झाला ना अर्थव्यवस्थेवर परिणाम?”

७५ वर्षांपासून करतोय सहन – खुशबू पाटनी

“पहलगाममध्ये काय घडलं ते आपल्या सर्वांना माहीत आहे. याला कलियुग म्हणतात. सर्व दरवाजे बंद झाल्यावर युद्ध करावे असं म्हटले जातं. मला वाटतं की आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत. आपण ७५ वर्षांपासून या पाकिस्तानी लोकांना आणि पाकिस्तानला सहन करत आहोत. प्रेम आणि शांतीचे नाटक पुरे झाले. आपण स्वतःशी खोटे बोलतोय, हा धर्माचाच विषय आहे. त्यांनी ज्या प्रकारे हिंदूंना मारले आहे, तो पूर्णपणे धार्मिक विषय आहे,” असं खुशबू म्हणाल्या.

दहशतवादी नाही, पाकिस्तानी आर्मी

“कोणीही असं कसं करू शकतं? कोणीतरी असं कसं आपल्या देशात येऊ शकतं? दहशतवाद, दहशतवाद करण्याऐवजी, आपण आता पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान आर्मी म्हणायला हवं. भारतीय सेनेचा भाग असल्याने, मला वाटतं की आपल्याकडे एक चांगली फोर्स आहे. आपल्याकडे १५ लाखांहून अधिक सैन्य आहे. आता आपण फार विचार करायला नको, एकदाचं काय ते होऊनच जाऊद्या. जर काश्मीरमध्ये कोणी देशद्रोही आहे असं वाटत असेल तर त्याला देशातून काढून टाकलं पाहिजे. सगळं संपवा एकदाचं. हा कोणता धर्म आहे? कोणत्या पुस्तकात असं लिहिलं आहे की निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारता येतं?” असं खुशबू पाटनी म्हणाली.

वाटाघाटी पुरे, आता… – खुशबू पाटनी

पुढे खुशबू म्हणाल्या, “आपण याला दहशतवाद म्हणून आपलं डोकं खराब करू नये. ही पाकिस्तानी आर्मी आहे. आपले सैन्य प्रशिक्षित आहे, आता फक्त आदेश मागायला हवा. या गोष्टी हलक्यात घेऊ नये, कारण त्यांचा संपूर्ण खेळ जिहाद आहे. त्यांना भारतीय आवडत नाहीत, मग ते कोणत्याही धर्माचे असले तरी. आपण सर्व काही वाटाघाटी करू, आपण हे करू, आपण ते करू, पुरे आता ७५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि वाटाघाटी सुरू आहेत. आता त्यांना संपवा. माझे रक्त खवळतंय, ज्या प्रकारे लोकांना मारलंय, तसंच त्यांना संपवायला हवं.”