दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती ९० च्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने लाखो लोकांना वेड लावलं होतं. दिव्याने फार कमी वेळात प्रसिद्धीच्या त्या शिखरांना स्पर्श केला, ज्याची चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्रीला आकांक्षा असते. अवघ्या तीन वर्षांत तिने २० चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडची नंबर वन हिरोईन बनली. मात्र, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.
दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. तिचे वडील ओमप्रकाश भारती विमा कंपनीत काम करत होते आणि आई गृहिणी होती. दिव्याने नववीपर्यंत शिक्षण घेतले होते. अभ्यास टाळण्यासाठी तिने फिल्मी दुनियेत प्रवेश केल्याचे बोलले जाते. जेव्हा दिव्या तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा ५ एप्रिल १९९३ रोजी तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तिच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. दिव्याला या जगाचा निरोप घेऊन ३० वर्षे झाली, पण आजही तिच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही. १९९८ मध्ये, प्रदीर्घ तपासानंतर, मुंबई पोलिसांनी दिव्याचा मृत्यू हा अपघाती मानून प्रकरण बंद केले.
पाच एप्रिलच्या दिवशी काय झालं होत?
‘एबीपी लाइव्ह’ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताच्या दिवशी दिव्या चेन्नईहून मुंबईतील तिच्या घरी परतली होती. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती हैदराबादला जाणार होती, पण पायाला दुखापत झाल्यामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले. त्यादिवशी फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचा नवरा दिव्याच्या घरी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांनी मिळून दारू पिली .यावेळी दिव्याची मोलकरीणही घरात हजर होती.
हेही वाचा- Video: अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरुख खानचं गौरीशी जोरदार भांडण? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
कसा झाला दिव्याचा मृत्यू?
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या तिच्या बाल्कनीत नशेच्या अवस्थेत बसली होती. या बाल्कनीला ग्रील नव्हती. वृत्तानुसार, उठण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि ती थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडली. अपघातानंतर तिला तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. काहींनी दिव्याचा मृत्यू हा अपघात मानला तर काहींनी याला षड्यंत्र म्हटले. दिव्याच्या मृत्यूला तिचा पती साजिद नाडियादवाला यालाही जबाबदार धरण्यात आलं होतं. पण दिव्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप कोणालाच माहिती नाही.