काही चित्रपट कितीही जुने झाले तरीही लोकप्रियतेच्या शिखरावर असतात. ‘शोले’, ‘हम साथ साथ है’, ‘बॉबी’, ‘स्वदेश’ अशा अनेक चित्रपटांच्या यादीत ‘वीर-झारा’ हे नाव घेतले जाते. ‘वीर झारा’ या चित्रपटाला १२ नोव्हेंबर २०२४ ला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुख खान( Shah Rukh Khan), प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. या रोमँटिक चित्रपटाचे बॉलीवूडमध्ये महत्वाचे योगदान आहे. आता चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अभिनेत्री दिव्या दत्ताने या चित्रपटाच्या शूटिंगवेळच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. दिव्या दत्ताने प्रीती झिंटाच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

k

काय म्हणाली अभिनेत्री?

दिव्या दत्ताने नुकतीच स्क्रीनला मुलाखत दिली. यावेळी ‘वीर झारा’ चित्रपटाबद्दल बोलताना दिव्या दत्ताने म्हटले, “यश चोप्रा दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटात काम करणे हे अत्यानंदाची बाब होती. ‘वीर झारा’ हा चित्रपट माझ्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरला. लहान असल्यापासूनच मला यश चोप्रांच्या चित्रपटात काम करायचे होते. नायिकेची भूमिका निभावायची होती. मी ‘कदम’ हा शो करत होते. आदित्य चोप्रांनी त्या शोमध्ये मला पाहिले आणि मला वायआरएफकडून फोन आला. त्या फोनवर मला समजले की, आदित्य आणि यश अंकल यांना मला भेटायचे आहे. मी जेव्हा चित्रपटाची गोष्ट ऐकली तेव्हा ते कथानक मंत्रमुग्ध करणारे होते. आताच्या पिढीला प्रेमाची ती खोली आणि संयम शिकणे गरजेचे आहे, जी सोशल मीडियाने नष्ट केली आहे.”

“मला तो चित्रपट करायचा होता, मात्र मी एकाच पद्धतीच्या भूमिका करते असा शिक्का मला नको होता. त्यामुळे मी थोडी गोंधळले होते. आदित्यला माझ्या मनात काय चालू आहे ते समजले आणि त्याने मला सांगितले की ही भूमिका साधी नाही. खूप खास भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी तू कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहशील. मी घरी आले, माझ्या आईबरोबर याबद्दल संवाद साधला. माझ्या आईने मला सांगितले की, तुला यामध्ये एक्स फॅक्टरचा समावेश करण्याची गरज आहे; त्यामुळे लोक तुला ओळखतील. तो माझ्यासाठी मंत्र झाला. लोक मला वीर झारामुळे ओळखू लागले.”

“माझे भाषेवरचे प्रभुत्व चांगले व्हावे याची आदित्यने पुरेपूर काळजी घेतली होती. त्याने माझी खूप तयारी करून घेतली होती. आदित्यने मला लंडन, पाकिस्तान आणि इतर ठिकाणच्या लोकांशी बोलायला लावले. ते कसे बोलतात हे शिकायला लावले. मला घराच्या मालकाबरोबर तसेच ड्रायव्हरबरोबरदेखील बोलायचे होते. त्यामुळे माझे पात्र ज्या पद्धतीने त्या चित्रपटात बोलते, त्यातील शब्दांशी लोक स्वत:ला जोडून घेऊ शकले.”

शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्रीने म्हटले, “तो माझा नेहमीच आवडता सहकलाकार राहील. शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, “मी तुझी भाषा ऐकू शकतो का, मी त्याबद्दल इतरांकडून खूप ऐकत आहे.” तो माझी काळजीदेखील करायचा. आम्ही एखाद्या गोष्टीवर वेड्यासारखे हसायचो. एक सीन शूट करताना जेव्हा जेव्हा मी लाकडाच्या खाटेवरून उठायचे, त्यावेळी पूर्ण सेट अप खाली पडायचा. एकदा तर तो संपूर्ण सेटअप माझ्या अंगावर पडला आणि शाहरूख व मी हसत सुटलो, ते क्षण कायम लक्षात राहतील.”

हेही वाचा: अभिषेक बच्चनचे निम्रत कौरशी अफेअर असल्याच्या चर्चा; अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल

दरम्यान, वीर झारा चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर ६०० स्क्रीनवर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे. वायआरएफ (YRF)ने टोरंटो, न्यूयॉर्क सिटी, मेलबर्न, यूएईमधील शहरे, इस्तंबूल आणि सिंगापूर यांसह जगभरातील सात शहरांमध्ये चाहत्यांबरोबर सेलिब्रेशनचे नियोजन केले आहे. ‘वीर झारा’च्या री-रिलीज प्रिंट्समध्ये पहिल्यांदाच ‘ये हम आ गये है कहाँ’ हे डिलिट केलेले आयकॉनिक गाणे समाविष्ट असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya dutta reveals experience of working with shah rukh khan in veer zaara nsp