अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या खास मतांसाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. जे मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असतं ही त्यांची शैली. याच नाना पाटेकरांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्यांना देवावर विश्वास आहे का हे विचारण्यात आलं त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. तसंच आपण सिगारेट कशी सोडली हेपण सांगितलं आहे.

तनुश्री दत्ताने केलेले आरोप फेटाळले

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. २००८ मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याबरोबर गैरवर्तन केलं होतं, असं तनुश्री म्हणाली होती. आता नाना पाटेकर यांनी या मुद्द्यावर आपली बाजू मांडली आहे. तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले. तनुश्रीने जे आरोप केले तसं काहीही घडलेलंच नाही असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. एक काळ होता की आपल्याला सिगारेटचं व्यसन होतं पण आपण ते सोडलं असंही नाना पाटेकर म्हणाले.

हे पण वाचा- “तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

नाना पाटेकर सिगारेटच्या व्यसनाबाबत काय म्हणाले?

सुरुवातीच्या काळात मी दिवसाला ६० सिगारेट ओढत असे. मला एके दिवशी खूप खोकला झाला. माझ्या बहिणीकडे गेलो होतो. तिच्या मुलाचा आठ दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यावेळी मी बहिणीकडे गेलो असताना मला सारखी खोकल्याची उबळ येत होती. त्यावर बहीण मला म्हणाली मी अजून काय काय वाईट बघायचं आहे? ती गोष्ट माझ्या मनाला फार लागली. मी त्यानंतर मुंबईला आलो. त्यादिवशी ठरवलं सिगारेट ओढायची नाही. त्यादिवशी ओढली नाही. त्यानंतर मी सलग पाच दिवस सिगारेट ओढली नाही. बहिणीला फोन करुनही सांगितलं की मी पाच दिवस सिगारेट ओढलेली नाही. त्यावर बहीण मला म्हणाली मी तुला काळजीने सांगितलं होतं. तुला ओढायची असेल तर ओढ पण प्रमाण कमी कर. पण मला त्यानंतर असं वाटलंच नाही. रोज स्वतःला सांगायचो सिगारेट ओढायची नाही. सवय सुटली. आज २० वर्षे झाली आहेत सिगारेट ओढली नाही असं म्हणत नाना पाटेकर यांनी सिगारेट कशी सोडली यावर भाष्य केलं. द लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी हे वक्तव्य केलं. देवाला मानता का ? हा प्रश्नही नाना पाटेकर यांना विचारण्यात आला त्यावरही ते बोलले.

देवावर विश्वास आहे का?

“मी देवापेक्षा जास्त माणसाला मानतो. देवाने तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय. आता त्याला फार त्रास देऊ नका. आठ आणे टाकून लाख रुपये मागू नका. आपण आपलं काम करत राहायचं. जेव्हा जाऊ देवाकडे तेव्हा त्याच्याशी बोलू. देवावर श्रद्धा नाही असं नाही. माझी देवावर श्रद्धा आहे. मी प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या आश्रमात गेलो होतो. त्यातून काही क्लिप घेऊन माझा एक व्हिडीओही व्हायरल केला असं मी ऐकलं होतं. पण मी बागेश्वर धामला वगैरे गेलो नाही.” असं नाना पाटेकर म्हणाले.

मी मणिकर्णिका घाटावर गेलो होतो. तिथे प्रेतं जळताना पाहून मला त्रास झाला. आजच्या घडीला आई, वडील, बहीण, भाऊ कुणीही राहिलं नाही. माझ्या पुढच्या पिढीचे लोक आहेत. पण आठवणी आहेतच. त्या कुठे जाणार? असंही नाना पाटेकर म्हणाले.