आपल्या जबरदस्त अभिनयामुळे केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचं नाव सगळ्यांनाच परिचित आहे. वयाच्या ७२ व्या वर्षीही ते तितक्याच उत्साहाने आणि स्फूर्तिने काम करतात. ‘गहराईयां’, ‘कुत्ते’, ‘चार्ली चोप्रा’सारख्या काही नव्या चित्रपटात आणि सीरिजमधील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. अभिनयाबरोबरच नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात, पण तुम्हाला नसीरुद्दीन यांच्या मोठ्या भावाबद्दलच्या काही गोष्टी ठाऊक आहेत का?
अले मुहम्मद शाह व फारूख सुलतान या जोडप्याच्या पोटी तीन मुलांनी जन्म घेतला. जहिरुद्दीन, जमीरुद्दीन व नसीरुद्दीन. यापैकी नसीरुद्दीन यांनी अभिनयात स्वतःचा नशीब आजमावलं त्यामुळे त्यांचं नाव सगळ्यांना परिचयाचं आहे. परंतु नसीरुद्दीन यांचे मोठे बंधु नेमके कोण? ते सध्या काय करतात? याबद्दल फारशी कुणालाच माहिती नाही. तर याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : “… तर दंगली उसळल्या असत्या”, अमित सानाच्या आरोपांवर पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत स्पष्टच बोलला
जहिरुद्दीन शाह यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार जमीरुद्दीन शाह हे नसीरुद्दीन यांचे थोरले बंधु आहेत. जमीरुद्दीन हे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सीनियर जनरल आहेत. याबरोबरच ते भारतीय लष्कराचे उपप्रमुखही होते. सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर जमीरुद्दीन यांनी ‘सशस्त्र सेना ट्रिबुच्या खंडपीठा’वरील प्रशासकीय सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे.
२०१२ ते २०१७ या काळात त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषविले आहे. जमीरुद्दीन शाह यांचे सुपुत्र मोहम्मद अली शाह हेदेखील भारतीय सैन्यातील अधिकारी व मोटीवेशनल स्पीकर म्हणून काम करतात. तर त्यांची कन्या साइरा शाह हलीम या राजकारणात कार्यरत आहेत. जमीरुद्दीन यांचे सुपुत्र मोहम्मद शाह यांनी चित्रपटातही नशीब आजमावलं आहे. श्रीराम राघवन यांच्या ‘एजेंट विनोद’, व विशाल भारद्वाज यांच्या ‘हैदर’मध्ये त्यांनी छोट्या भूमिका निभावल्या आहेत. नसीरुद्दीन यांचीही दोन्ही मुलं विवान व इमाद हेदेखील अभिनेते म्हणून चित्रपटसृष्टीत स्वतःचं करिअर घडवू पहात आहेत.