२०२३ हे वर्षं संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आणि याच बॉलिवूडच्या किंग खान म्हणजेच शाहरुख खानसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. २०२३ मध्ये बऱ्याच हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘गदर २’पासून नुकत्याच आलेल्या ‘अॅनिमल’पर्यंत वेगवेगळ्या हिंदी चित्रपटांनी दमदार कमाई केली. पण २०२३ हे वर्षं शाहरुख खानचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेल्या किंग खानने वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पठाण’मधून दमदार कमबॅक केला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. वेगवेगळ्या कारणांमुळे ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात सापडला परंतु प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. शाहरुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५०.८ कोटी रुपयांची कमाई केली.

यानंतर काहीच महिन्यात अॅटली दिग्दर्शित ‘जवान’मध्ये शाहरुख झळकला. या चित्रपटातील शाहरुखचे दोन्ही लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडले. दाक्षिणात्य स्टाईलमध्ये बनलेल्या ‘जवान’मध्ये शाहरुखने प्रथमच विजय सेतुपती, नयनतारा यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाने शाहरुखच्याच ‘पठाण’चे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले. ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ११५२ कोटी रुपयांची रेकॉर्ड-ब्रेकिंग कमाई केली.

आणखी वाचा : बराक ओबामांना आवडले २०२३ मधील ‘हे’ चित्रपट; ‘ओपनहायमर’चं केलं कौतुक तर ‘या’ कलाकृतींकडे केलं दुर्लक्ष

‘जवान’ पाठोपाठ आता ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डंकी’देखील चांगली कमाई करत आहे. ‘जवान’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत ‘डंकी’ची कमाई फिकी पडत असली तरी बॉक्स ऑफिसवर पुन्हा किंग खानचा डंका वाजला आहे. ‘डंकी’ने आत्तापर्यंत २८३.१३ कोटी रुपयांची केली आहे. ‘डंकी’ने आणखी १७ कोटींची कमाई केली तर यावर्षाची शाहरुखची कमाई २५०० कोटींची होईल अशी शक्यता आहे. एका वर्षात २५०० कोटींची कमाई करणारा शाहरुख हा पहिला अभिनेता असेल. ‘डंकी’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे येत्या काही दिवसांत शाहरुखच्या नावावर हा रेकॉर्ड नक्की होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know how much shahrukh khan earned in 2023 from 3 films avn