Shah Rukh Khan Birthday Special: अभिनेता शाहरुख खान सिनेसृष्टीत आला तेव्हापासूनच त्याची जादू कायम आहे. सुरुवातीला अँटी हिरो म्हणून आणि नंतर बॉलिवूडचा रोमान्सचा बादशाह म्हणून शाहरुखने त्याची ओळख तयार केली आहे. शाहरुख खान ‘दिवाना’, ‘दिल आशना है’ सारख्या चित्रपटांमधून आला… आता ‘जवान’ आणि ‘पठाण’ या अगदी या वर्षीच आलेल्या चित्रपटांपर्यंत त्याची जादू कायम आहे. पठाण आणि जवान चे विषय वेगळे असले तरीही शाहरुखची क्रेझ कायम आहे हे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन कळतं. शाहरुख खान होणं हे सोपं नक्कीच नाही. कारण त्याचं रील लाइफ जितक्या रंगांनी भरलंय तशाच वादांनी त्याचं खरखुरं आयुष्यही समोर येत राहिलं आहे. वानखेडे मैदानावरचा राडा आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काय घडलं होतं ते देखील आपल्याला माहीत आहे. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत शाहरुख आणि त्याच्याभोवती फिरणारे किंवा त्याच्यामुळे झालेले खरेखुरे वाद.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन स्मोकिंगमुळे शाहरुख विरोधात तक्रार

शाहरुख खानला धूम्रपानाची सवय आहे. त्याला अनेकदा सिगारेट ओढताना स्पॉट केलं गेलं आहे. मात्र जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियममध्ये जेव्हा शाहरुख सिगारेट ओढत होता त्यावेळी त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती. स्टार स्क्रिन अवॉर्ड्सचा शो होणार होता. त्या दरम्यान शाहरुख खान सिगारेट ओढत असल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

‘माया मेमसाबच्या पोस्टर’चा वाद

शाहरुख खान १९९२ मध्ये मोठ्या पडद्यावर झळकला. दिवाना या सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. याच दरम्यान त्याचा आणखी एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाचं नाव होतं ‘माया मेमसाब’ केतन मेहता दिग्दर्शित या सिनेमात फारुख शेख, दीपा साही आणि शाहरुख होते. या सिनेमात दीपा साही आणि शाहरुख यांचा बोल्ड लव्ह सीन होता. याच लव्ह सीनचं पोस्टर एका मॅगझीनने छापलं होतं तसंच शाहरुखविषयी गॉसिपही छापलं होतंच. शाहरुखने ते मॅगझीन पाहिलं आणि तो प्रचंड चिडला. त्याने मॅगझीनच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर या साप्ताहिकाच्या संपादकाने शाहरुख खानच्या विरोधात पोलीस तक्रार केली. ज्यामुळे शाहरुखला एक दिवस तुरुंगात काढावा लागला होता. शाहरुखला दुसऱ्या दिवशी या प्रकरणात जामीन मिळाला.

शाहरुख खान वाढदिवस स्पेशल (फोटो-फेसबुक पेज, शाहरुख खान)

‘ओम शांती ओम’ सिनेमा आणि अभिजितचा शाहरुखवर आरोप

‘ओम शांती ओम’ हा शाहरुखच्या हिट सिनेमांपैकी एक सिनेमा मानला जातो. या सिनेमासाठी शाहरुख खानने 8 pack abs ही केले होते. या सिनेमात शाहरुखसाठी गायक अभिजितने पार्श्वगायन केलं होतं. सिनेमा रिलिज झाल्यानंतर अभिजितने शाहरुख खानवर हा आरोप केला होता की सिनेमात चांगली गाणी गाऊनही शाहरुखने योग्य मोबदला दिला नाही. यावर शाहरुख म्हणाला होता की मी ज्यांच्याबरोबर कामही करत नाही असेही लोक प्रसिद्ध होतात. त्यानंतर या दोघांमध्ये बराच वाद झाला होता.

शाहरुख आणि सलमानचं भांडण

शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांचं भांडण माध्यमांमध्ये बरंच गाजलं होतं. कतरिना कैफ वरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बाचाबाची आणि हाणामारीही झाली अशाही बातम्या आल्या होत्या. या दोघांमध्ये वाद इतका विकोपाला गेला होता की दोघं एकमेकांचं तोंडही पाहात नव्हते. अखेर काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या रमजान पार्टीत दोघं एकत्र आले. त्यानंतर या दोघांचा वाद मिटला. शाहरुखच्या पठाण सिनेमात सलमानने कॅमिओ केला. ज्याची चांगलीच चर्चाही झाली होती. मात्र या दोघांची दोस्ती जशी चर्चेत राहिली तसाच यांच्यातला वादही चर्चेत होता.

शाहरुख खान आणि वानखेडे स्टेडियमचा वाद

आयपीएल सुरु झालं तेव्हाच शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स ही टीम विकत घेतली होती. २०१२ मध्ये गौतम गंभीर केकेआर टीम फॉर्मात होती. मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआरची मॅच होती. नाणेफेक जिंकून केकेआरने फलंदाजी केली. पण त्यांना १४० धावा करता आल्या. मात्र केकेआरच्या नारायणने त्यादिवशी मुंबईच्या संघाला असं नाचवलं की मुंबईचा संघ १०८ धावांमध्ये बाद झाला. हा सामना मुंबईत होता म्हणून शाहरुख खान त्याच्या मुलांसह सामना बघायला आला होता. तसंच शाहरुखचे मित्र, काही नातेवाईकही या मैदानावर आले होते. केकेआर जिंकल्याचा जल्लोष सुरु झाला. सगळेजण मैदानावर जाऊ लागले. शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि काही मित्र यांच्यासह वानखेडे स्टेडियमध्ये जाऊ लागला तेव्हा विकास दळवी नावाच्या गार्डने शाहरुखला हटकलं. त्यानंतर दळवी आणि शाहरुख यांच्यात बाचाबाची झाली. शाहरुखने आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विकास दळवीने त्याला आता जाण्यापासून रोखलं. या दोघांचा वाद झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लोकही तिथे पोहचले. त्यांच्याशीही शाहरुखने हुज्जत घातली. त्यावेळी मुंबईचे एसएसपी असलेल्या इक्बाल शेख यांनी अखेर शाहरुखला बाहेर नेलं. सगळा प्रकार कॅमेरे सुरु असताना घडला. वृत्तवाहिन्यांनी दिवसभर ही बातमी चालवली आणि दुसऱ्यादिवशी शाहरुखचा मराठी गार्ड बरोबरचा वाद घालतानाचा फोटोही छापून आला.

शाहरुख खान वाढदिवसानिमित्त देणार मोठी पार्टी

वानखेडेच्या वादावर काय म्हणाला होता शाहरुख?

यावर स्पष्टीकरण देत शाहरुख म्हणाला की विकास दळवी माझ्या मुलांवर धावून आला म्हणून माझा संयम सुटला होता. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी म्हणाले की शाहरुख खान मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने आम्हाला शिवीगाळ केली. तत्कालीन एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी या प्रकरणात बैठक बोलवली. त्यानंतर शाहरुखला वानखेडेवर येण्यास पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

विकास दळवी यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दळवी यांनी शाहरुखला करारी बाणा दाखवल्याने मनसेने त्यांचा सत्कार केला, अशी बातमी आली. दळवी काही दिवस लाइमलाइटमध्ये राहिले, पण त्यांना होणारा त्रास तेच जाणून ‌ होते. मिडीयाने त्यांचा पिच्छा पुरवला. मीडिया त्यांच्या घरापर्यंत पोहोचला होता. दळवी सततच्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्या आणि मीडिया बाईटमुळे पुरते वैतागले. काही दिवस मुंबई सोडून त्यांनी आपल्या मूळ गावी मुक्काम हलवला. हा वाद शाहरुखच्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा वाद ठरला.

शाहरुख खान आणि आमिर खान वाद

शाहरुख खान आणि आमिर खान या दोघांनी एकमेकांसह आत्तापर्यंत एकदाही काम केलं नाही. शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र आले. आमिर आणि सलमान एकत्र आले पण शाहरुख आणि आमिर यांची जोडी कधीही सिनेमात दिसली नाही. तरीही आमिर खानने शाहरुख बाबत एक ब्लॉग लिहिला होता ज्यामुळे या दोघांमध्ये ‘ब्लॉग वॉर’ रंगलं. “मी माझ्या फार्म हाऊसवर असलेल्या झाडाखाली बसलो आहे. समुद्र सपाटीपासून हे ठिकाण ५ हजार फूट उंचीवरचं आहे. इरा, जुनैद आणि अम्मीही माझ्या बरोबर आहेत. शाहरुख माझे तळवे चाटतो आहे. मी त्याला मधून मधून बिस्किट खाऊ घालतो आहे. आता मला अजून काय हवं?” या आशयाचा ब्लॉग आमिर खानने लिहिला होता. ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. ज्यानंतर आमिर खानने स्पष्टीकरण दिलं की मी सगळं गंमतीत लिहिलं होतं आणि शाहरुख हे माझ्या कुत्र्याचं नाव आहे. तसंच मी हे नाव ठेवलेलं नाही. फार्म हाऊस ज्यांच्याकडून विकत घेतलं त्यांनी हे नाव ठेवलं आहे. यावर शाहरुखचीही प्रतिक्रिया आली होती. मला आमिरने जे काही लिहिलं त्याचं वाईट वाटलं नाही. तो जर म्हणाला की तो गंमत करत होता तर ते तसंच असेल. पण माझ्या मुलांना आता आमिर खान आवडत नाही. शाहरुखची ही प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आमिर खानने शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागितली होती.

आर्यन खानला जेव्हा ड्रग्ज प्रकरणात अटक झाली

ऑक्टोबर २०२१ या महिन्यात आर्यन खानला म्हणजेच शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB ने अटक केली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. त्याच्याकडे १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आढळून आल्याचं समोर आलं होतं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. आर्यन खानचा मोबाइलही जप्त करण्यात आला होता. मात्र या प्रकरणाचा राजकीय मुद्दा झाला. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे अशा आरोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या. त्यानंतर २७ ऑक्टोबरला शाहरुख खान मुलासाठी जामीन मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र हे प्रकरण माध्यमांमध्ये चांगलंच गाजलं होतं.

लता मंगेशकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आणि शाहरुखमुळे निर्माण झालेला वाद

भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर शाहरुख खान त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचला. त्यावेळी शाहरुख खानने त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून ‘दुवा’ मागितली. मात्र शाहरुखच्या या कृतीवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवाला हात लावून अभिवादन केलं. त्यानंतर दुवा मागत हातावर फुंकर घातली. इस्लाममध्ये ही पद्धत आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दुवा मागितली जाते. त्यानंतर हातावर फुंकर घातली जाते कारण आपणही त्या वाटेने म्हणजेच मृत्यूच्या वाटेने कधी ना कधी तरी जाणार आहोत. दुवा मागण्यात आणि फुंकर घालण्यात काहीही गैर नाही. मात्र ‘शाहरुख खान थुंकला’ असा अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे शाहरुख त्याच्या या कृतीवरुन चांगलाच ट्रोल झाला. मात्र त्याने या प्रकरणात होणाऱ्या टीकेची पर्वा केली नाही.

शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतल्यानंतरही वाद निर्माण झाला होता

शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. यशाची अनेक शिखरं गाठलेल्या या अभिनेत्याने त्याचं स्वतःचं असं एक स्थान तयार केलं आहे. शाहरुख जे पडद्यावर करतो ते लोकांना पटवून देण्याचं कसब त्याच्या अंगी आहे. त्यामुळेच तो शाहरुख खान आहे. पण त्याचा इथवर झालेला प्रवास सोपा नाही. त्यासाठी त्याची प्रचंड मेहनत आणि त्याचं काम करत राहण्यातलं सातत्य हे गुण घेण्यासारखे आहेत.