आयुष्मान खुराना हा सातत्याने करत असणाऱ्या त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतंच त्याने याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या १४ ऑक्टोबरला आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. यामध्ये आयुष्मान स्त्रीरोगतज्ञ या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ट्रेलरवरुन तरी चित्रपट विनोदी वाटत असला तरी नुकतंच या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट सर्टिफिकेशन बोर्डकडून मिळालं आहे. म्हणजेच हा चित्रपट पाहण्यासाठी वयाची मर्यादा आहे.

आणखी वाचा : मोनू देओरीने केली उर्फी जावेदची भन्नाट मिमिक्री; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार हा चित्रपट पाहताना सीबीएफसी बोर्डातील काही लोकांना या चित्रपटातील काही विनोद कुटुंबासमवेत पाहण्यासारखे न वाटल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय यातील काही दृश्यं काढून टाकण्याचा पर्यायही चित्रपटनिर्मात्यांसमोर ठेवण्यात आला होता, पण ते काढले तर चित्रपटाचं गांभीर्यच नाहीसं होईल म्हणून निर्मात्यांनी ‘ए’ सर्टिफिकेटचा स्वीकार केला.

आयुष्मान खुरानाचा हा पहिलाच चित्रपट आहे जो कुटुंबासमवेत बसून थिएटरमध्ये बघता येणं कठीण असेल. अर्थात यानंतर बोर्डाने चित्रपटाला कोणतेही कट न सुचवता हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरला आपल्याला यात नेमकं काय आक्षेपहार्य आहे ते समजेल. या चित्रपटात आयुष्मानबरोबरच रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शहा या महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor g a first film of bollywood actor ayushmann khurrana which gets an adult rating from cbfc avn
Show comments