अनेक कलाकार प्राणीप्रेमी आहेत. ते आपल्या पाळीव प्राण्यांची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. अनेक सेलिब्रिटींकडे श्वान आहेत. ते त्यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करताना दिसतात. अनेक जण आपल्या लाडक्या श्वानांना फिरायला घेऊन जाताना दिसतात. पण एक बॉलीवूड अभिनेता असा आहे, ज्याच्याकडे १०० हून अधिक श्वान आहेत. त्याचं प्राण्यांवर इतकं प्रेम आहे की त्याने ४५ कोटी रुपयांची मालमत्ता त्या श्वानांना आरामात राहता यावं, यासाठी वापरली आहे. या ठिकाणी प्रत्येक श्वानासाठी वेगळी खोली असून त्यांची काळजी घेण्यासाठी माणसं कामावर ठेवण्यात आली आहे. श्वानांसाठी उदार मनाने हे सगळं करणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आहेत.

मिथुन चक्रवर्ती श्वानप्रेमी आहेत. ते ११६ श्वानांची देखभाल करत असल्याचं म्हटलं जातं. हे सगळे श्वान त्यांच्या मुंबई आणि इतर ठिकाणावरील मालमत्तेत राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन यांनी मुंबईजवळील मढ आयलंडमध्ये त्यांच्या दीड एकर जागेत ७६ श्वान ठेवले आहेत. हाऊसिंग डॉट कॉमनुसार सुमारे ४५ कोटी रुपयांच्या जमिनीवर बांधलेल्या या मालमत्तेत त्यांचं घर आहे, त्यांचे श्वानही इथेच राहतात. तसेच याठिकाणी खेळायचं मैदानदेखील आहे. याठिकाणी त्यांच्या श्वानांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ज्याठिकाणी वडील होते वेटर, त्या तिन्ही इमारतींचा मालक आहे सुनील शेट्टी; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

गेल्या वर्षी एका मुलाखतीत मिथुन यांची सून अभिनेत्री मदालसा शर्माने याबाबत खुलासा केला होता. “प्रत्येक श्वानासाठीव वेगळी जागा आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या-वेगळ्या खोल्या देखील आहेत. एक कर्मचारी या श्वानांची काळजी घेतो. श्वानांची लहान मुलांप्रमाणे काळजी घ्यावी लागते, त्यांना आंघोळ घालणं त्यांना वेळेवर जेवायला देणं, त्यांना फिरायला नेणं ही मोठी जबाबदारी आहे. जेव्हा तुमच्याकडे मोठ्या संख्येने श्वान असतात तेव्हा ती जबाबदारी आणखी वाढते, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे जास्त लोक असावे लागतात,” असं मदालसा म्हणाली होती.

बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती

मिथुन यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे डोक्यावर छत नव्हतं. ते रेल्वे स्टेशनवर किंवा फुटपाथवर झोपून दिवस काढायचे. पण सिनेसृष्टीत आल्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांचं नशीब पालटलं. आता ते ४०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे देशातील अनेक शहरांमध्ये मालमत्ता आहेत. देशभरात त्यांच्या जवळपास तीन डझन मालमत्ता आहेत, असं म्हटलं जातं. यामध्ये मढ आयलंडमधील घर, उटी येथील घर आणि अनेक हॉटेल्स आणि कॉटेज यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे मसिनागुडीमध्ये १६ बंगले आणि कॉटेज आणि म्हैसूरमध्ये १८ बंगले आहेत. त्यांचे मुंबईजवळ फार्महाऊसही आहे.