बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता. आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली.
मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली. फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत रणवीर सिंह दिसणार असून नुकताच त्याचा फर्स्ट लूकसुद्धा व्हायरल झालाआणि यामुळे फरहानला लोकांचा चांगलाच रोष बघावा लागत आहे. शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंहची निवड पाहून बरेच लोक नाखुश असल्याचं दिसत आहे.
आणखी वाचा : ‘या’ दिवशी येणार ‘थँक यू फॉर कमिंग’चा ट्रेलर; भूमी पेडणेकरचा जबरदस्त बोल्ड अंदाज चर्चेत
मध्यंतरी फरहानने यावर भाष्य केलं होतं. यापाठोपाठ फरहानचा पार्टनर रितेश सिदवानी यानेही त्याची भूमिका मांडली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना रितेश म्हणाला, “लोकांच्या या ट्रोलिंगचा आमच्यावर काहीही फरक पडलेला नाही. जेव्हा डॉन ३ प्रदर्शित होईल तेव्हाच त्यातून आम्ही लोकांना उत्तर देऊ. जेव्हा तुम्ही याचा ट्रेलर पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल कि या माणसाने नेमकी काय मेहनत घेतली आहे ते.”
फरहाननेदेखील अशीच बाजू मध्यंतरी मांडली होती. शाहरुख नसेल तर डॉन ३ पाहणार नाही असा पवित्राही काही नेटकऱ्यांनी घेतला आहे. एकूणच जे प्रेक्षक शाहरुखच्या ‘डॉन ३’ची आतुरतेने वाट पहात होते त्यांचा हा टीझर पाहून हिरमोड झाला आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द फरहान अख्तर याचं दिग्दर्शन करणार आहे.