काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून लोक दहशतवाद्यांचा निषेध करीत आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदूंची क्रूरपणे हत्या केल्याने लोक भडकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसंबंधित सर्व गोष्टींना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अशातच आता ‘अबीरगुलाल’ या चित्रपटालाही लोकांनी विरोध केल्याचे पाहायला मिळते. ‘अबीरगुलाल’ हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, देशभरातून या चित्रपटाला विरोध होत असून, चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.

याचं प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री वानी कपूर व फवाद खान मुख्य भूमिकांत आहेत. तसेच, या चित्रपटात अभिनेत्री रिद्धी डोगराही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पण, पाकिस्तानी अभिनेता चित्रपटात असल्याने अनेक भारतीयांकडून चित्रपटाला बॅन करण्याची मागणी केली जात आहे. अशातच नुकतेच रिद्धीने एक्सवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. रिद्धीने म्हटले होते, “आता वेळ आलीये देशातील प्रतिष्ठित मुस्लिमांनी पुढे येऊन यासाठी पावलं उचलण्याची.” पण तिच्या या विधानामुळे तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले. तिच्या या विधानानंतर तिला एका नेटकऱ्याने इथे ज्ञान देऊन, स्वत: पाकिस्तानी कलाकाराबरोबर काम करीत आहेस. असे म्हटले.

ट्रोलिंगला उत्तर देत रिद्धी, “जेव्हा सरकारने याबाबत परवानगी दिली तेव्हाच मी काम केलं. नियम, कायदे यांचा मी आदर करते. देशांतर्गत शांतेतेचं वातावरण असणं हे महत्त्वाचं आहे.” असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. “पुढे तिने सभ्यता ही समुदायावर आधारित असते; पण जर आपण इतरांचे आपल्या देशात स्वागत करू शकतो, त्यांना चांगली वागणूक देऊ शकतो, तर मग वेळ आल्यावर आपण याला आळा घातला, तर त्यात काही गैर नाही”, असे म्हटले आहे. या संदर्भात अधिक बोलताना रिद्धीने ती स्वत: काश्मीरची असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले, “मी जम्मू-काश्मीरची आहे. मला तेथील इतिहास आणि इतर सर्व गोष्टी माहीत आहेत. माझाही संताप होतो. फक्त मी तो व्यक्त न करता, शांत राहणं योग्य समजते. त्यामुळे तुम्ही माझ्यावर राग काढू नका”.

दरम्यान, ‘अबीरगुलाल’ चित्रपटात वानी कपूर, फवाद खान, रिद्धी डोगरासह ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल व सोनी राजदान हे कलाकारदेखील आहेत. परंतु, आता या चित्रपटाला बॅन करण्याच्या मागण्या होताना दिसत आहेत. परंतु, अखेर याबाबत सरकारच निर्णय घेऊ शकते आणि यावर सरकारकडून नक्की कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.